बॉलिवूडला आणि आमिरच्या करिअरलाही एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा ‘लगान’ चित्रपट १८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला सर्वोत्तम परदेशी भाषेच्या चित्रपटासाठी अॅकॅडमी अवॉर्डचं मानांकनही मिळालं होतं. या चित्रपटाचं जगभरातून कौतुक झालं. विशेष म्हणजे आमिरनं साकारलेला भुवन आजही अनेकांच्या लक्षात आहे.

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित या चित्रपटानं अनेक पुरस्कार पटकावले, मात्र हा चित्रपट आमिरनं सुरूवातीला नाकारला होता. ‘गोवारिकर यांनी चित्रपटाची कथा मला ऐकवली तेव्हा पाचव्या मिनिटांलाच मी हा चित्रपट नाकारला. गावाकडे सारा भरायला पैसे नसतात, गावात दृष्काळ पडलेला असतो अशावेळी गावातील लोक ब्रिटीशांशी क्रिकेट खेळण्याची पैज लावतात. जर गावकरी खेळात जिंकले तर ब्रिटीश सारा माफ करतील अशी अट असते. साधारण हे कथानक ऐकल्यावर मला ही कथा खूपच विचित्र वाटली. असं कुठेही घडणं शक्य नाही म्हणत मी गोवारिकर यांना नकार कळवला होता असं आमिर म्हणाला.

मात्र तीन महिन्यांनंतर हे कथानक पूर्ण करून गोवारिक पुन्हा आमिरकडे आले आणि त्यावेळी ‘लगान’ची कथा आमिरला खूपच भावली. ‘लगान’ची पूर्ण कथा ऐकल्यानंतरच आमिरनं गोवारिकरांना होकार कळवला. ही कथा आमिरला इतकी आवडली की आपल्या पालकांना देखील ही कथा ऐकवण्याची विनंती त्यांनी गोवारिकरांना केली. आमिरच्या विनंतीचा मान राखत गोवारिकर यांनी ती आमिरच्या पालकांना ऐकवली. ‘लगान’ची कथा ऐकून भावूक झालेल्या आमिरच्या पालकांनी आमिरला या चित्रपटात काम करण्यासाठी तातडीनं होकार दिला अशा अनेक आठवणी आमिरनं शेअर केल्या.