बॉलिवूडमधील आदर्श जोडी समजले जाणारे अमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या आमिर खान-किरण राव यांच्या निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा होतेय. असं असलं तरी घटस्फोटाचा निर्णय जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमिर खान आणि किरण राव यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र दिसले. एका कार्यक्रमात दोघेही सहभागी झाले. यावेळी दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल भावना व्यक्त केल्या.

आमिर आणि किरणने शनिवारी (३ जुलै) एक संयुक्त निवेदन जाहीर करून विभक्त होत असल्याची माहिती दिली. “१५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला. या काळात आमचं नातं विश्वास आणि सन्मानानं पुढे जात राहिलं. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत,” असं म्हणत त्यांनी निर्णय जाहीर केला. मात्र, त्यानंतर दोघांनी घटस्फोट का घेतला, याबद्दलच्या चर्चा होतं आहे. या चर्चा सुरू असतानाच आमिर आणि किरण एका कार्यक्रमात एकत्र दिसून आले. यावेळी त्यांनी त्यांच्या निर्णयाबद्दलही भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा- आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट ; १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर झाले विभक्त

आमिर-किरण पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात. फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आमिर आणि किरण सहभागी झाले होते. दोघेही सध्या कारगिलमध्ये असून, तिथूनच त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. यावेळी किरण राव म्हणाली,’तुम्ही लोकांनी ऐकलंच असेल की, आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. कदाचित तुम्हाला वाईट वाटलं असेल. कदाचित धक्काही बसला असेल, पण आम्ही तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की, आम्ही या कामात सोबत राहणार आहोत’, किरण म्हणाली.

हेही वाचा- “आता फातिमासोबत शुभमंगल”, आमिर खानच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

यावेळी आमिर खान म्हणाला,’काल आमच्याविषयी ऐकलं असेल. आम्ही सध्या आनंदी आहोत. आमच्या नात्यात बदल झाला असेल, पण सोबतच काम करणार आहोत. पानी फाऊंडेशन आम्हाला आमच्या मुलासारखं आहे. जसा आमचा आझाद आहे, तसंच आमच्यासाठी पानी फाऊंडेशन आहे. तुम्हाला वाईट वाटू नये. पण आम्ही चार-पाच वर्षांपासून विचार करत होतो. आता आम्हाला तुमच्या सदिच्छा हव्यात,’ असं आमिर म्हणाला.

आमिर-किरणने संयुक्त निवेदनात काय म्हटलं होतं?

”१५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचं नातं विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिलं. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करू. मुलाचा सांभाळ करण्यासोबत आम्ही फिल्म, पाणी फॉउंडेशन आणि आम्हाला आवडत असलेल्या इतर अनेक प्रोजेक्टवर पुढेही एकत्र काम करू. आम्हाला समजून घेत आमच्या या निर्णयात आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आमच्या कुटुंबियांचे आणि मित्र परिवाराचे आभार,” अशी भूमिका मांडत दोघांनी विभक्त होत असल्याची माहिती दिली.