अभिनेता आमिर खानचा संवेदनशील सामाजीक प्रश्नांवर भाष्य करणारा ‘सत्यमेव जयते – २’ हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सत्यमेव जयते’च्या पहिल्या पर्वातदेखील अनेक संवेदनशील समाजीक प्रश्नांना वाचा फोडण्यात आली होती. प्रेक्षक ‘सत्यमेव जयते’च्या दुसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहात असून, या विषयीच्या चर्चांनी जोर धरला आहे. आमिर खानने बिहारमधील गया येथील गेहलूर खेड्यात जाऊन दशरथ मांझी या ‘माऊंटन मॅन’च्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्याला आदरांजली वाहिली. मांझी हा अतिशय गरिबीत जगणारा कष्टाळू कामगार होता. आपल्या खेड्यातील लोकांना दळणवळणाचा सोपा मार्ग मिळावा यासाठी त्याने एकट्याने १९६० ते १९८२ या २२ वर्षाच्या कालावधीत डोंगर पोखरून ३० फुट रुंदीचा ३६० फुटाचा रस्ता तयार केला.
ह्या माणसाचे जीवन म्हणजे प्रेमाने भरलेली जीवनकथा असून, आपल्या बायको प्रती असलेल्या निष्ठेसाठी ज्ञात असल्याचे आमिर म्हणाला. २ मार्च रोजी सुरू होणाऱ्या ‘सत्यमेव जयते’च्या दुसऱ्या पर्वाची सुरूवात मांझीच्या कथेने होणार आहे. मांझीच्या धडाडीला आणि दृढ निष्ठेला सलाम करत आमिर म्हणाला, जवळजवळ दोन दशक कठीण असे भले मोठे खडक फोडून एकट्याने रस्ता तयार करण्याच्या त्याच्या कामगिरीने त्याच्यातील दृढ संकल्पाबरोबरच पत्नी प्रती असलेल्या त्याच्या प्रेमाचे आणि बांधिलकीचे दर्शन होते.
सात वर्षापूर्वी निधन झालेल्या मांझीने गावकऱ्यांना अत्री येथे असलेल्या रुग्णालयात जाण्यासाठी सोप्या मार्गाची सोय करून दिली.
‘सत्यमेव जयते’च्या टीमचे सदस्य पुढील तीन दिवसात मांझीच्या परिवाराला भेटून सहकार्य करतील याची खात्री आमिर खानने मांझीच्या परिवाराला दिली.