बॉलिवूड अभिनेता आमिर खान तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या आमिर खान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळीत आमिर खानला ‘बॉयकट लाल सिंह चड्ढा’ ट्रेंडबद्दलही विचारण्यात आलं आणि आमिरनं यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केलं.
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबद्दल आमिर खानला प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “जेव्हा लोक बॉलीवूड आणि ‘लाल सिंग चड्ढा’वर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. खासकरून लोक माझ्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी यासाठी करतात कारण, त्यांच्या मते मला भारत देश आवडत नाही. माझं आपल्या देशावर प्रेम नाही. पण हे सत्य नाही. काही लोकांना असं वाटतं की मी देश आवडत नसलेल्या व्यक्तींपैकी आहे आणि हे खूपच दुर्दैवी आहे. मी विनंती करतो की कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. माझा चित्रपट पाहा.”
दरम्यान २०१५ मध्ये आमिर खान एका वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. “आपला देश खूप सहिष्णू आहे, परंतु काही लोक दुष्टपणा पसरवत आहेत.” असं त्यानं म्हटलं होतं. एवढंच नाही तर आमिर खानची पूर्वश्रमीची पत्नी आणि चित्रपट निर्माती किरण राव हिने देखील देशाबद्दल वक्तव्य केलं होतं, “भारत देश सुरक्षित नाही त्यामुळे मी माझ्या मुलाच्या सुरक्षेसाठी देश सोडण्याचा विचार करत आहे.” असं विधान तिनं केलं होतं. ज्यावरून तिच्यावर बरीच टीका झाली होती. आमिर आणि किरण राव यांच्या या वक्तव्यांमुळेच नेटकरी त्यांना हिंदुविरोधी आणि देशद्रोही म्हणत आहेत.
आणखी वाचा- KBC 14: आमिर खानबद्दल बिग बींची तक्रार म्हणाले….
आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ बद्दल बोलायचं तर, हा टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’ हॉलीवूड चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. साऊथ अभिनेता नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहे.