बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या बहुचर्चित आगामी ‘पीके’ चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरवरील अभिनेता शाहरुख खानच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
शाहरुखच्या विधानाबाबत बोलत असताना आमिर म्हणाला की, “आत्ता या क्षणी माझ्या मनात त्याबद्दल अनेक गोष्टी आहेत पण, मी ते बोलणे टाळतो आहे. जे दुसऱयांसाठी खड्डा खणतात त्यांच्यासोबत काय होते? हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे अशा वक्तव्यांपासून मी दूर राहतो.”
आपल्या आगामी ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात शाहरुखने आमिरच्या ‘पीके’ चित्रपटाच्या वस्त्रहीन पोस्टरची खिल्ली उडविली होती. वस्त्रहीन अवस्थेत पोज दिलेल्याचा टॅलेन्ट म्हणून विचार केला जाऊ शकत नाही असे शाहरुखने उपहासाने म्हटले होते.
याआधीही दोघांची एकमेकांवरील वादग्रस्त विधाने चर्चेचा विषय ठरली होती. शाहरुख तर माझ्या पायाजवळ घुटमळत असतो असे म्हणत आमिरने हल्लाबोल करत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर ‘शाहरुख’ हे माझ्या श्वानाचे नाव असल्याचे स्पष्टीकरण आमिरने दिले होते. त्यावेळी शाहरुखने प्रत्युत्तरात आपल्या ब्लॉगवरून माझ्या मित्रांच्या अशा वक्तव्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही वास्तविक मला त्याचा आनंद होतो असे मिश्किलपणे म्हटले होते.