आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांनीही आपण चित्रपट करणार नसल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. २०१४ मध्ये गितीका त्यागी या अभिनेत्रींनं ‘मोगुल’चे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. हे प्रकरण पुढे न्यायालयात देखील गेलं. आमिरला ही बाब समजल्यानंतर त्यांनं पत्नीसह दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यासोबत काम न करण्याचं ठरवलं आहे.
‘आम्ही ज्या व्यक्तीसोबत चित्रपट करणार होतो त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत असं आम्हाला समजलं. त्याबाबत आम्ही चौकशी केली असता, लैंगिक छळाबाबतचं ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती मिळाली. अद्याप त्या प्रकरणाचा निकाल आलेला नाही, त्यामुळे या चित्रपटातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. आम्ही नेहमीच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध केला आहे, सामाजिक समस्यांचं निराकरण करण्यात आम्ही प्रतिबद्ध आहोत. आम्ही कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाचा निषेध करतो आणि अशा प्रकरणांमध्ये खोट्या आरोप करणाऱ्यांचीही निंदा करतो’, असं आमिर खान आणि किरण राव यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
टी- सीरिजचे भूषण कुमार यांनी देखील पीटीआयशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक छळाबाबतचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं आमिरला समजलं आहे त्यानं सुभाष कपूरसोबत काम करण्यास नकार दिला आहे. तसेच टी- सीरिजदेखील यापुढे सुभाष कपूर यांच्यासोबत काम करणार नसल्याचं भूषण कुमार यांनी संबधित वृत्तसंस्थेला सांगितलं.