आमिर खानचा ‘दंगल’ हा सिनेमा २३ डिसेंबरला प्रदर्शित झाला. एका दिवसापूर्वी प्रदर्शित झालेला हा पूर्ण सिनेमा फेसबुकवर लीकही झाला आहे. २.३० तासांच्या या संपूर्ण सिनेमाची कॉपी फेसबुकवर शेअर केली जात आहे. एका पाकिस्तानी व्यक्तिने हा सिनेमा फेसबुकवर शेअर केला आहे.
लाइव्ह हिंदुस्तान या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार हाशमी या नावाच्या व्यक्तिने सर्वात आधी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला. हाशमीच्या फेसबुक प्रोफाइलनुसार तो मुळचा पाकिस्तानी असून तो दुबईमध्ये राहतो. या सिनेमाला शेअर करताना त्याने लिहिले की, ‘दंगल पूर्ण सिनेमा, आमिर खान, फातिमा शेख, सान्या मल्होत्रा. याला नक्की शेअर करा.’ रात्री शेअर केलेला हा व्हिडिओ काही तासातच व्हायरल झाला.
आतापर्यंत हा व्हिडिओ ४४७ हजार लोकांनी पाहिला आहे आणि साधारणतः २३ हजार लोकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे. असे असले तरी आमिरच्या दंगल सिनेमाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी ३० कोटींची कमाई केली आहे. ‘दंगल’ हा सिनेमा भारतात २३ डिसेंबरला शुक्रवारी प्रदर्शित झाला तर अमेरिका आणि कॅनडामध्ये बुधवारीच प्रदर्शित करण्यात आला.
भारतात ‘दंगल’ सिनेमा ४३०० स्क्रिन्सवर तर भारताबाहेर १००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. उत्तर अमेरिका, युएई-जीसीसी, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया येथे हा सिनेमा मोठ्या प्रमाणात प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘रंग दे बसंती’, ‘पीके’, ‘लगान’, ‘दिल चाहता है’ यांसारख्या सिनेमांतून प्रेक्षकांवर भुरळ पाडणाऱ्यांना आमिरकडून प्रेक्षक नेहमीच दर्जेदार कलाकृतीची अपेक्षा करतात. आपल्या चाहत्यांच्या या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आमिरही कोणतीच कसर बाकी ठेवत नाही. रुपेरी पडद्यावर एखादी भूमिका तंतोतंत साकारण्यासाठी आमिर खान नेहमीच जीवाचे रान करताना दिसतो. त्याच्या ‘दंगल’ सिनेमासाठीही त्याने आपल्या शरीरयष्टीवर बरीच मेहनत घेतली आहे.
गेल्या सात-आठ महिन्यात आमिरच्या शरीरयष्टीत झालेले बदल पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. सिनेमात योग्य असा लूक मिळावा म्हणून मी आमिरने त्याच्या शरीरयष्टीवर काम केले आहे. आमिरने तब्बल पाच महिने आपल्या शरीरयष्टीवर कशी मेहनत घेतली याचा ‘फॅट टू फिट’ प्रवास काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या व्हिडिओत पाहावयास मिळाला होता. पाच महिने उलटल्यानंतर आमिरने या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.