आमिर खान अभिनीत आणि राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ चित्रपटाने नव्या वर्षांच्या दुसऱ्या आठवडय़ात प्रवेश करताना आणखी एक विक्रम केला आहे. १९ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून केवळ १७ दिवसांत या चित्रपटाने ३०५.२७ कोटींची कमाई करत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या आठवडय़ात या चित्रपटाने ‘धूम ३’चा विक्रम मोडत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून आघाडी घेतली होती. मात्र या आठवडय़ात ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला चित्रपट म्हणून ‘पीके’ची नोंद झाली आहे.
देव आणि धर्माबद्दल एका परग्रवासीयाच्या नजरेतून विचार मांडणाऱ्या ‘पीके’ या चित्रपटाला प्रदर्शनापासूनच कट्टर हिंदुत्ववादी संघटनांच्या टीकेचा धनी व्हावे लागले होते. मात्र आमिर खान, संजय दत्त, अनुष्का शर्मा, सुशांत सिंग राजपूत, बोमन इराणीसारख्या कलाकारांची भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून विक्रमी कमाई केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने २६.६३ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे ३०.३४ कोटी आणि ३८.४४ कोटींची कमाई केली. नाताळच्या आधीच्या आठवडय़ात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. त्या आठवडय़ाचे शेवटचे तीन दिवस, नाताळचा आठवडा आणि नव्या वर्षांचा पहिला-दुसरा आठवडा हे निर्मात्यांनी बांधलेले गणित चांगलेच फळाला आले आहे. फक्त १७ दिवसांत ३०५.२७ कोटींची कमाई करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट असल्याचे ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर म्हटले आहे.