आमिर खानची मुख्य भूमिका असलेला ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट सध्या बहुविध कारणामुळे चर्चेत आहे. ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटाचा रिमेक असलेल्या या चित्रपटाचे हक्क मिळविण्यासाठी तब्बल आमिर खान दहा वर्ष सतत लॉस एंजेलिसला जाऊन अनकांची भेट घेत होता. अखेर दहा वर्षांनी त्याला हक्क मिळाले आणि १४ वर्षांच्या मेहनतीनंतर या चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

अडीच वर्षांनी आमिरने हा चित्रपट करण्यासाठी होकार दिला, मात्र… –

‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी पटकथा लेखक म्हणून नव्या भूमिकेत रसिकांसमोर येणार आहे. आमिरने २००८ साली ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याच वर्षी ‘फॉरेस्ट गम्प’च्या कथेचे भारतीयिकरण मी केले होते. अडीच वर्षांनी आमिरने हा चित्रपट करण्यासाठी होकार दिला. मात्र पुढची दहा वर्ष या चित्रपटाचे हक्क मिळवण्यात गेली, असे अतुल कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

Laal Singh Chaddha Trailer: ‘जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है…’ बहुचर्चित ‘लाल सिंह चड्ढा’चा ट्रेलर पाहिलात का?

अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केला आनंद –

‘फॉरेस्ट गम्प’चे हक्क मिळविण्यासाठी आमिरने जंग जंग पछाडले. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या हॉलिवूडपटाचे हक्क पॅरामाऊंट पिक्चर्स स्टुडिओकडे होते. दहा वर्ष आमिर लॉस एंजेलिसला सतत खेटे घालत होता. यासाठी त्याने अनेकांची भेट घेतली, असे अतुल यांनी सांगितले. शेवटी आमिरने हक्क मिळवलेच. आता १४ वर्षांनी ‘फॉरेस्ट गम्प’ चित्रपटाचा भारतीय अवतार ‘लाल सिंह चढ्ढा’च्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याबद्दल अतुल कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त केला.