Aapla Manus Trailer : ‘कर्ण मोठा झाला की प्रोब्लेम येणारच’; ‘आपला मानूस’चा धमाकेदार ट्रेलर

‘प्रत्येक घरावर एक डिटेक्टिव्ह पुस्तक लिव्हता येतंय’

नाना पाटेकर

वायाकॉम १८ मोशन पिक्चर्स प्रस्तुत व अजय देवगण निर्मित ‘आपला मानूस’ या मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत राहिला असून तो २०१८ मधील प्रमुख आकर्षण ठरला. चित्रपटामधील उत्तम कलाकार आणि त्याला जोड देणाऱ्या उत्तम कथानकामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. ‘आपला मानूस’च्या टीजरला १.५ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. नाना पाटेकर, सुमित राघवन आणि ईरावती हर्षे या कलाकारांसह नुकत्याच झालेल्या एका समारंभात निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला.

वाचा : …म्हणून अंकिता लोखंडेने नाकारला संजय लीला भन्साळींचा चित्रपट

ट्रेलरमध्ये शहरात राहणाऱ्या आणि शहरी जीवनशैलीच्या दबावाचा सामना करणाऱ्या राहुल आणि भक्ती गोखले या तरुण जोडप्याची कथा मांडली असून या भूमिका सुमित राघवन आणि ईरावती हर्षे यांनी साकारल्या आहेत. तसेच यात वडिलांबरोबरच्या नात्यातील गुंतागुंत सुध्दा दाखवलेली आहे. वडिलांच्या अनपेक्षित मृत्युमुळे त्यांच्या जीवनात मारुती नागरगोजे नावाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा प्रवेश होतो. ही भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली आहे. मारुती नागरगोजे यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे त्यांचे जग उलटेपालटे होते आणि त्यांच्या मनात जीवन व कुटुंबाविषयीच्या श्रध्दांवर प्रश्न उभे राहतात. विशेष म्हणजे ट्रेलरमधील दमदार संवाद हे त्यातील जमेची बाजूची ठरत आहेत.

फ्लॅशबॅक वाचा : दादांशी भेट आणि जगदीपचा आनंद…

चित्रपटातील भूमिकेविषयी नाना पाटेकर म्हणाले की, ‘नटसम्राट नंतर, मी काहीतरी विशेष माझ्याकडे येण्यासाठी वाट पहात होतो, एखादे असे पात्र जे ऐकताच क्षणी मला आवडेल आणि मारुती नागरगोजेमध्ये मला ते सापडले. ते एक क्लिष्ट पात्र आहे. मराठी चित्रपटांमध्ये मी याआधी कधीच अशी भूमिका साकारली नाही. तो मितभाषी असून त्याचे हावभाव आणि बोलण्याच्या विशिष्ट लकबीमुळे हे पात्र विलक्षण झाले आहे.’

‘आपला मानूस’ येत्या ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aapla manus official trailer nana patekar sumeet raghavan irawati harshe