Aarya Ambekar : गायक, अभिनेत्री आणि अभिनेता या मंडळींना त्यांच्या आरोग्याची, फिटनेसची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण स्क्रीन असो किंवा लाईव्ह कार्यक्रम त्यांना कायमच उत्फुर्त राहणं गरजेचं असतं. त्यामुळे स्क्रीनवर छान दिसण्यासाठी आणि एकूणच फिट राहण्यासाठी सेलिब्रिटी अनेकदा विशिष्ट पद्धतीचा डाएट प्लॅन, डेली रूटीन या गोष्टींचं नियमीत पालन करत असतात.
अनेक सेलिब्रिटी मुलाखतींमधून किंवा सोशल मीडियावरुन त्यांच्या फिटनेसबद्दल, दिनचर्येबद्दल, डाएटबद्दलची माहिती देत असतात. अशातच आता मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायिका आर्या आंबेकर हिनेसुद्धा तिच्या खाण्या-पिण्याच्या आवडी निवडींबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने ती प्रत्येक कार्यक्रमाआधी किंवा गाणं रेकॉर्ड करण्याआधी एक गोष्ट आवर्जून करते असंही म्हटलं आहे. त्यामुळे आर्याचे आवडते पदार्थ कोणते आहेत, ती प्रत्येक कार्यक्रमाआधी कोणती गोष्ट नियमीतपणे करते याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
‘सारे काही’ला दिलेल्या मुलाखतीत आर्याने याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने तिची आई खूप शिस्तप्रिय असून त्यांच्यामुळेच आज ती इतकी शिस्तप्रिय आहे असं म्हटलं आहे. त्या सतत तिला एकाजागी बसू नको, हालचाल करत राह, फोन वापरू नको अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला देतात ज्याचा उपयोग तिला होतो असं तिने या मुलाखतीत म्हटलं आहे.
प्रत्येक कार्यक्रमाआधी करते ‘ही’ गोष्ट
आर्याला मुलाखतीत कार्यक्रमात सादरीकरण करण्यापूर्वी तू कुठली एक ठरावीक गोष्ट करतेस का जे तुझ्यासाठी लकी ठरतं असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “लकी आहे की नाही माहीत नाही पण, मी ते नियमीत करते. मी चाहा पिते. चाहा प्यायल्यानंतर सगळं सेट झालं आहे असं वाटतं मला.” यावेळी आर्याने तिला आल्याचा चाहा आवडतो असं तिने सांगितलं आहे.
आर्याला पुढे तुझा आवडता पदार्थ कोणता आहे असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मेतकूट भात आणि तूप. चाटही आवडतं. माझी आई चाट खूप छान करते आणि पुरणपोळीसुद्धा कमाल करते.” आर्याने तिच्या आवडत्या पदार्थांची नाव सांगितल्यानंतर तिला घरगुती जेवणाची किंवा साध्या जेवणाची आवड असल्याचं दिसतं.
दरम्यान, आर्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अलीकडेच ‘झी मराठी’वरील ‘कमळी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. आर्याने आतापर्यंत तिच्या गायनाने तर अनेकांना मंत्रमुग्ध केलंच आहे पण तिने अभिनयातूनही अनेकांची पसंती मिळवली आहे.
