कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपरफुटी प्रकरणी जून महिन्यात दिल्लीत आंदोलन केलं होतं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणि कलाकारांनीही पाठिंबा दर्शवला होता. मात्र, प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझने कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाबाबत एक वक्तव्य करत “मला यात ओढू नका. मी एक कलाकार आहे, राजकारणी नाही”, असं म्हटलं होतं.
दिलजीतच्या या वक्तव्यावरून अभिजीत दिपके यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता कॉक्रोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजीत दिपके यांनी पंजाबी गायक दिलजीत दोसांझला उद्देशून इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत कौतुक केलं आहे. तसेच दिलजीतने सीजेपीच्या आंदोलनाबाबत केलेल्या टिप्पणीवरही भाष्य केलं आहे.
अभिजीत दिपके यांनी पोस्टच्या माध्यमातून म्हटलं की, जून महिन्यात झालेल्या आंदोलनाबाबत दिलजीत दोसांझने केलेल्या एका टिप्पणीमुळे आपल्याला काहीसं दु:ख झालं होतं, वाईट वाटलं होतं. पण ही नाराजी कोणत्याही वैयक्तिक शत्रुत्वामुळे नव्हती’, असं म्हणत दिपके यांनी दिलजीतचं कौतुक केलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
अभिजीत दिपकेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं?
“हे दिलजीत पाजींसाठी. पाजी, जून महिन्यात जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो, तेव्हा तुमच्या एका टिप्पणीमुळे मला वाईट वाटलं होतं आणि दुःखही झालं होतं. असं नाही की माझा तुमच्यावर काही वैयक्तिक राग होता. त्याचं कारण असं की, मी तुम्हाला नेहमीच योग्य गोष्टींच्या बाजूने ठामपणे उभं राहताना पाहिलंय. मी तुम्हाला नेहमी अशा व्यक्तीच्या रूपात पाहिलं की जी अन्यायाविरुद्ध आवाज उठवते. खरं तर मी नेहमीच तुमचा चाहता राहिलो आहे आणि आजही आहे. मी आजही तुमची गाणी ऐकतो. एवढंच नाही तर भारतात परतण्यापूर्वी मे महिन्यात मी शिकागोमध्ये तुमच्या कॉन्सर्टलाही गेलो होतो. तुमच्या संगीतासाठी नाही, तर मला तुमचा नेहमीच खूप आदर वाटत आला आहे”, असं अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे.
“तुमचं धैर्य, तुम्ही आपल्या मुळांशी घट्ट जोडलेलं राहूनही ज्या प्रकारे भारताला जागतिक व्यासपीठावर नेण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचं मला नेहमीच कौतुक वाटतं. कदाचित म्हणूनच तुमच्या त्या टिप्पणीमुळे मला थोडं वाईट वाटलं होतं, कारण माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे. पण मतभेद किंवा गैरसमज माझ्या मनातील तुमच्याबद्दलचा आदर आणि कौतुक बदलू शकत नाहीत”, असं दिपकेंनी म्हटलं आहे.
