Chetak Screen Awards 2026 : चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६ सोहळ्यात चित्रपट आणि OTT विश्वातील सर्वोत्तम कलाकार व कलाकृतींचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात अभिनेता अभिषेक बॅनर्जी याला ‘स्टोलन’मधील त्याच्या भूमिकेसाठी ओटीटीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना तो म्हणाला की, त्याला या अवॉर्डची अपेक्षा नव्हती, कारण त्याच्या सूत्रांनी त्याला सांगितले होतं की तो त्याला हा पुरस्कार मिळणार नाही.

पुरस्कार जिंकल्यानंतर आपल्या भाषणात अभिषेक म्हणाला, “हे मी बोलायला हवं की नाही मला माहीत नाही, पण काही दिवसांपूर्वी माझ्या सूत्रांनी मला सांगितलं होतं की मला हा पुरस्कार मिळत नाहीये.” त्यावर ‘द इंडियन एक्सप्रेस’ (हिंदी) चे संपादक सौरभ द्विवेदी म्हणाले, “मला तुम्हाला हे सांगायचंय की, सूत्रांच्या माहितीवरून पुरस्काराचा विजेता कोण असेल हे ठरवण्याचा काळ आता राहिलेला नाही.”

अभिषेकने नंतर म्हटलं की त्याच्या सूत्रांनी दिलेली माहिती चुकीची आहे. तो म्हणाला, “तेच तर मी म्हणतोय. यातून मी दोन धडे शिकलो. पहिला म्हणजे, मी माझे सूत्र बदलले पाहिजेत. आणि दुसरे म्हणजे, इथे कोणतीही ‘सूत्रे’ काम करत नाहीत आणि पारदर्शकता आहे. त्यामुळे स्क्रीन आणि ज्युरींचे खूप खूप आभार.”

भाषणाचा समारोप करताना अभिषेक बॅनर्जीने ‘स्टोलन’च्या टीमचे आभार मानले आणि सांगितलं की, “हा चित्रपट आमच्यासाठी आणि वैयक्तिकरित्या माझ्यासाठी एक साहसी प्रवास राहिला आहे. एका बेसमेंटपासून सुरू झालेला हा प्रवास माझ्या लिव्हिंग रूममध्ये प्रत्यक्षात उतरला.” त्याने नवीन कलाकारांना चित्रपटाचे निर्माते गौरव धिंग्रा यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्लाही दिला. तसेच, अभिनेत्याने दिग्दर्शक करण तेजपाल आणि त्याच्या सहकलाकारांचेही आभार मानले.

‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’द्वारे सुरू करण्यात आलेले ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ हे भारतातील अत्यंत प्रतिष्ठित आणि विश्वसनीय चित्रपट पुरस्कार मानले जातात. कलेचा गौरव हा केवळ गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि आदर यावरच आधारित असावा, या विश्वासातून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे. ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६’ चे नामांकन आणि विजेते यांची निवड ‘स्क्रीन अकादमी’ (SCREEN Academy) या स्वतंत्र आणि ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थेने केली आहे. या अकादमीमध्ये ५३ नामवंत चित्रपट निर्माते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.