‘मिस वर्ल्ड’ संस्थेद्वारे ६४ व्या आंतरराष्ट्रीय सौंदर्यवती स्पर्धेदरम्यान ‘ब्युटी विथ अ पर्पज’ कार्यातील बांधिलकीसाठी लावण्यवती ऐश्वर्या राय बच्चनला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रविवारी लंडन येथे पार पडलेल्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेदरम्यान ऐश्वर्याला सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना ऐश्वर्याबरोबर तिचा पती अभिषेक बच्चन, कन्या आराध्या आणि ऐश्वर्याची आई वृंदा राय मंचावर उपस्थित होते. या सोहळ्याची छायाचित्रे अभिषेकने ‘इन्स्टाग्राम’ या सोशल मीडिया साईटवर टाकली असून, छायाचित्रांबरोबर लिहिलेल्या संदेशात तो म्हणतो, ‘मिस वर्ल्ड’तर्फे माझ्या पत्नीला अतिशय प्रभावशाली आणि यशस्वी ‘मिस वर्ल्ड’ म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ती पुरस्कार स्वीकारत असताना छोट्या आराध्याला सांभाळण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. माझ्यासाठी हे अपूर्वाईचे काम होते. दोन दशकांपूर्वी ऐश्वर्या राय बच्च्नने ‘मिस वर्ल्ड’च्या किताबावर आपले नाव कोरले होते, तर सुष्मिता सेन या अन्य भारतीय सौंदर्यवतीने ‘मिस युनिव्हर्स’ किताब पटकावला होता. यावर्षी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत सहभागी झालेली कोयल राणा ‘मिस वर्ल्ड’चा किताब प्राप्त करण्यात अपयशी ठरली असून, गेली अनेक वर्षे भारतीय सौंदर्यवतींची पहिल्या दहांमध्ये येण्यापलीकडे मजल जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. या वर्षी ‘मिस साऊथ अफ्रिका’ने ‘मिस वर्ल्ड’चा किताब आपल्या नावावर केला.