‘गुलशन कुमार’ यांना गोळी लागल्यानंतरचा आवाज ‘अबू सालेम’ला ऐकायला यावा म्हणून…

डॉन अबू सालेमने सिंगर गुलशन कुमार यांना १० कोटींची खंडणी मागितली होती. ती देण्यासाठी गुलशन कुमार यांनी नकार दिला होता.

(Photo: The Indian Express Archive)

टी सिरीजचे मालक गुलशन कुमार हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार अब्दुल रौफ दाऊद मर्चंट याला जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. रौफचे एकूण वर्तन पाहता तो दयेस पात्र नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

१२ ऑगस्ट १९९७ साली जुहू इथे टी सिरीजचे गुलशन कुमार यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांना जवळपास १६ गोळ्या मारल्या होत्या. या प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार अब्दुल रौफ दाऊद मर्चंट याच्यासोबत आणखी इतर व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले. या प्रकरणात न्यायालयानं १९ पैकी १८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यात ‘टीप्स’ कंपनीचे मालक रमेश तौरानी यांचाही समावेश होता. एप्रिल २००९ मध्ये आजारी आईला भेटण्यासाठी काही दिवसांसाठी त्याला फर्लोवर सोडण्यात आलं होतं. मात्र, त्याचा गैरफायदा घेऊन तो बांग्लादेशमध्ये फरार झाला होता. त्यानंतर १० नोव्हेंबर २०१६ मध्ये बांग्लादेश पोलिसांनी त्याला अटक करत भारताकडे सोपवलं.

तो काळा दिवस ‘गुलशन कुमार’चे कुटुंबीय विसरू शकणार नाहीत

गुलशन कुमार वैष्णो देवीचे भक्त होते. वैष्णो देवीवर त्यांची मोठी श्रद्धा होती. ते दररोज मुंबईतल्या अंधेरीमधील जीतनगरमध्ये असलेल्या जीतेश्वर महादेव मंदिरात जात असत. १२ ऑगस्ट १९९७ रोजी सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे ते मंदिरात पुजा करण्यासाठी पोहोचले होते. पूजा करून मंदिराबाहेर पडल्यानंतर अचानक त्यांच्या पाठीवर कुणीतरी बंदुक ठेवली. डॉन अबू सालेमने सिंगर गुलशन कुमार यांना १० कोटींची खंडणी मागितली होती. ती देण्यासाठी गुलशन कुमार यांनी नकार दिला होता. म्हणून त्याने गुंडाला पाठवून गुलशन कुमार यांच्यावर बंदूकीतून १६ राउंड फायर केले.

Gulshan-Kumar-Murder-Abu-Salem

शूटरने त्यांचा मोबाईल १० ते १५ मिनिट ऑन ठेवला होता

गुलशन कुमार यांनी स्वतःला वाचवण्यासाठी त्यावेळी मंदिराबाहेरील आजुबाजुच्या घरांचे दार ठोठावले. परंतु त्यावेळी कुणीच दरवाजा उघडला नाही. त्यावेळी गुलशन कुमार यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हर होता. या ड्रायव्हरने मालकाला वाचवण्यासाठी शूटरवर कलश देखील फेकला होता. पण अगदी निर्दयीपणे ते शूटर गुलशन कुमार यांच्यावर राउंड फायर करत होते. यात मालकाला वाचवणाऱ्या ड्रायव्हरच्या पायावर सुद्धा त्यांनी गोळी मारली होती. गुलशन कुमार यांची हत्या केल्यानंतर शूटरनी त्यांचा फोन जवळजवळ १० ते १५ मिनिटे ऑन ठेवला होता. गुलशन कुमार यांच्यावर राउंड फायर केल्यानंतरचा त्यांचा आवाज अबू सालेमला ऐकता यावा म्हणून शूटरनी त्यांचा फोन ऑन ठेवला होता.

खुप झाली पूजा, आता वर जाऊन पूजा कर….

ज्यावेळी शूटरनी गुलशन कुमार यांच्यावर पाठीवर बंदूक ठेवली, त्यावेळी गुलशन कुमार यांनी त्यांना विचारलं. ‘हे तु काय करीत आहे ? यावर शूटरने उत्तर देत म्हणाला, ‘खुप पूजा केली. आता वर जाऊन पूजा कर.’ यानंतर गुलशन कुमार काही बोलण्यापूर्वी शूटरनी त्यांच्यावर फायरींग सुरू केली. यात त्यांच्या गळ्यात आणि पाठीला गोळ्या लागल्या होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Abu salem had been listening to gulshan kumars screams for 10 minutes the shooter prp