लक्ष्मी अगरवाल हे नाव अनेकांच्या परिचयाचं आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मीनं खचून न जाता असंख्य पीडितांना जगण्याची नवी प्रेरणा दिली. अॅसिड हल्ल्यातील पीडितांच्या कल्याण्यासाठी लढणाऱ्या लक्ष्मीनं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय. अशा या लक्ष्मीच्या कामाची दखल बॉलिवूडलाही घ्यावी लागली. तिच्या जीवनसंघर्षावर अधारित ‘छपाक’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोन लक्ष्मी अगरवालच्या भूमिकेत आहे. या लक्ष्मी बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात.

दिल्लीच्या गरीब कुटुंबात लक्ष्मीचा जन्म झाला. लक्ष्मीला तिच्या मैत्रिणीच्या भावाने लग्नाची मागणी घातली. मात्र लक्ष्मी लहान असल्यानं तिनं लग्नाला नकार दिला. तेव्हा लक्ष्मीचं वय होतं १६ तर मैत्रीणीच्या भावाचं वय होतं ३१. या नकाराचा सूड उगवण्यासाठी मैत्रीणच्या भावानं अ‍ॅसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप केला. ही घटना २२ एप्रिल २००५ सालची. तेव्हापासून वयाच्या पंचविशीपर्यंत तिने फक्त अ‍ॅसिडहल्ल्याशी झुंज दिली. स्वत:चा चेहरा कसा वितळत होता आणि त्यावर चार शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, याच्या कटू आठवणी लक्ष्मीकडे आहेत, ‘मी तीन महिने रुग्णालयात भरती होते. ज्या वॉर्डमध्ये मला ठेवण्यात आलं होतं तिथे आरसा नव्हता. रोज सकाळी एक नर्स पाण्याचं वाडगं घेऊन खोलीत याचची. त्या पाण्यात मी माझ्या चेहऱ्याचं प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न करायची. माझ्या संपूर्ण चेहऱ्याला पट्टी बांधलेली असल्यानं मला काहीच दिसायचं नाही.

माझ्या नाकावर पूर्वीपासून एक ओरखडा होता. अॅसिड हल्ल्यानंतर जेव्हा माझ्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यावेळी मी डॉक्टरांना माझ्या नाकावर असणारा तो ओरखडा काढण्यासाठी सांगितला होता. माझा चेहरा शस्त्रक्रियेनंतर चांगला होईल असं मला वाटलं होतं मात्र ज्या दिवशी मी माझा चेहरा आरश्यात पाहिला त्यादिवशी मात्र पूर्णपणे कोलमडले’ असा अनुभव तिनं दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना व्यक्त केला होता.

या अॅसिड हल्ल्याची सुत्रधार असलेली तिची मैत्रीण- तिचा भाऊ आणि या कामी मदत करणारा त्याचा मित्र या तिघांनाही शिक्षा झाल्यावर स्वस्थ न बसता २००६ सालीच तिने जनहित याचिकेद्वारे अ‍ॅसिडहल्ला पीडितांसाठी विशेष कायदे असावेत, अंगावर अ‍ॅसिड फेकण्याचा उल्लेख असलेले कलम सध्याच्या फौजदारी कायद्यात आणि दंडसंहितेत असावे यासाठी आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, अशा मागण्या न्यायपीठापुढे मांडल्या. तिच्या प्रयत्नांना यश आले मार्च २०१३ मध्ये केंद्र सरकारने असा कायदा (यात अ‍ॅसिडहल्ल्याखेरीज वस्त्रहरण, पाठलाग आणि सार्वजनिक अपमान यांचाही समावेश होता.) आणला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आचारी काम करणारे लक्ष्मीचे वडील २०१२ मध्ये गेले, भाऊ छातीच्या असाध्य रोगाने अंथरुणात, आई वृद्ध असतानाही घरदार पणाला लावून लक्ष्मीने लढा दिला.. तोच आता तिला पुढील कार्याची दिशा दाखवत आहे. तिची संघर्ष गाथा ‘छपाक’मध्ये पहायला मिळणार आहे.