दशकभराहून अधिक काळ अभिनेता रणवीर सिंग हे नाव बॉलीवूडमध्ये कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिलं आहे. यशराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ‘बँड बाजा बरात’सारख्या चित्रपटातून सुरुवात करणारा कोणी एक तरुण ते अल्लादीन खिलजी असो बाजीराव असो वा क्रिकेटपटू कपिल देव.. प्रत्येक भूमिका समरसून करणारा अभिनेता रणवीर सिंग ही ओळख त्याने निर्माण केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाच्या यशामुळे आनंदित असलेल्या रणवीरने चित्रपट पाहिल्यानंतर त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोणने दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यानिमित्ताने कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा देताना दिग्दर्शक आदित्य चोप्राने दिलेला ‘तू अभिनय कर..’ हा सल्ला मनावर घेऊन आपण ते साध्य करू शकलो, याबद्दलही त्याने समाधान व्यक्त केले आहे.

रणवीर सध्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उपस्थित राहणार आहे. दीपिका पदुकोण यंदा कान महोत्सवात परीक्षकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे एकीकडे दीपिका चर्चेत आहे, तर नेहमीप्रमाणे तिला भेटण्यासाठी कानवारी करणाऱ्या रणवीरमुळे त्यांच्या प्रेमाची गोष्टही पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट पाहिल्यानंतर दीपिकाने अगदी प्रामाणिकपणे तिचं मत व्यक्त केलं, असं तो सांगतो. दीपिका ही आपल्या सर्वात जवळची व्यक्ती आहे. त्यामुळे ती आपल्या कामाबद्दल जे काही सांगते ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं असतं, असं तो म्हणतो. ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट पाहिल्यानंतर तिने जी प्रतिक्रिया दिली, तशीच प्रतिक्रिया तिने ‘८३’मधील आपले काम पाहिल्यानंतर दिली होती. तिचे शब्द, तिचं मत थेट काळजाला भिडल्याचं तो सांगतो. ‘जयेशभाई जोरदार’मध्ये रणवीरने एका गुजराती तरुणाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठीही त्याने आपल्या शरीरयष्टीप्रमाणेच देहबोलीसाठीही मेहनत घेतली आहे. प्रत्येक भूमिकेसाठी तो ज्या पद्धतीची मेहनत घेतो, तयारी करतो, त्याच पद्धतीची तयारी त्याने याही भूमिकेसाठी केली होती आणि त्यामुळेच या भूमिकेतही तो रणवीर सिंग न राहता त्या व्यक्तिरेखेशी पूर्णपणे समरस झाल्याचे पडद्यावरही जाणवते. याचसाठी दीपिकाने त्याचे भरभरून कौतुक केल्याचे त्याने सांगितले.

प्रत्येक भूमिकेत तो त्या त्या व्यक्तिरेखेशी इतका समरस होऊन, परकाया प्रवेश झाल्याप्रमाणे चपखल भूमिका करतो आणि तरीही तो व्यावसायिक चित्रपटातील अभिनेता म्हणूनही तितकाच लोकप्रिय आहे. समांतर किंवा वास्तववादी चित्रपटांसाठी ज्या पद्धतीने अभिनय केला जातो तसाच अभिनय तो प्रत्येक चित्रपटात करतो. तरीही व्यावसायिक किंवा मसाला चित्रपटातही तो यशस्वी ठरतो. एक अभिनेता म्हणून हरतऱ्हेच्या सिनेमामध्ये त्याने जो समतोल साधला आहे, त्याबद्दल दीपिकाने आश्चर्य व्यक्त केले आहे. दीपिकाने ‘८३’च्या वेळी कपिल देव यांच्या रूपात पाहिल्यानंतरही आपल्याला अशीच प्रतिक्रिया दिली होती, असं तो म्हणतो. त्याच्या कारकीर्दीत तो ज्या यशस्वी टप्प्यावर आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करत असतानाच सुरुवातीच्या काळातील संघर्षांच्या दिवसांचीही त्यात महत्त्वाची भूमिका आहे, असं तो सांगतो. अगदी सुरुवातीला त्याचा ‘बँड बाजा बरात’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, त्या वेळी त्याचे पोस्टर्स चित्रपटगृहांबाहेर सगळीकडे लागले होते. असेच एक पोस्टर पाहताना दोन तरुणांमधला संवाद त्याच्या कानी पडला. कोण आहे हा कलाकार? तो हिरोसारखा दिसत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. त्या वेळी त्याचा निर्माता आणि गुरू आदित्य चोप्रा याने त्याला सल्ला दिला होता. ‘‘तू हृतिक रोशन दिसत नाहीस.. तेव्हा तू अभिनय कर,’’ असं त्याने सांगितलं होतं. आपल्याकडे हिरोसारखा देखणा चेहरा नाही, त्यामुळे अभिनयाच्या जोरावरच आपल्याला इथे वाटचाल करता येईल, याची खूणगाठ त्याने तेव्हापासून मनाशी पक्की बांधली होती. आज आपण ते साध्य करू शकलो, याबद्दल तो समाधान व्यक्त करतो.

एक अभिनेता म्हणून आपली जी जडणघडण झाली, त्यात भन्साळी यांचा वाटा मोलाचा आहे, असं तो म्हणतो. अभिनयाची कला किती प्रगत करावी, याला कुठलीही मर्यादा नाही. एक कलाकार म्हणून त्यांनी माझ्याकडून वेगवेगळय़ा पद्धतीने अभिनय करून घेतला. तेव्हा कुठलीही भूमिका करताना आपण आपल्या नियमाप्रमाणे ते करू शकतो, आपल्यातली क्षमता आपणच शोधू शकतो, अजमावू शकतो, याची जाणीव झाल्याचे त्याने सांगितले. कलाकार म्हणून आता वेगवेगळय़ा व्यक्तिरेखा साकारण्याची, हरतऱ्हेचे चित्रपट करण्याची आपली भूकही वाढत चालली आहे, असंही त्याने सांगितलं.