scorecardresearch

“…यापुढे कुठलीही अडचण आली तरी मला सांगा”, ‘धर्मवीर’ आनंद दिघेंच्या आठवणीत आदेश बांदेकर भावूक

“माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग आहेत, जे मी विसरु शकणार नाही.”

ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला. सध्या या टिझरची सर्वत्र चर्चा सुरु आहे. नुकतंच शिवसेना नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. त्यासोबत त्यांनी आनंद दिघेंसोबतचा एक किस्साही शेअर केला.

नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान अभिनेते आदेश बांदेकर यांना या चित्रपटाचा टिझर कसा वाटला याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले, “मला हा टिझर बघून फार आनंद झाला आहे. खरं तर मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे या दोघांनी हे मोठं आवाहन स्वीकारलं. मी जेव्हा प्रसाद ओकला त्या भूमिकेत बघितलं तेव्हा खरंच मला वाटलं की अरे साहेब… अशी भावना माझ्या मनात आली. माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग आहेत, जे मी विसरु शकणार नाही. यानिमित्ताने ते सर्व प्रसंग अधोरेखित झाले.”

“ती ११ लाखांची पैठणी मी देणार नाही…”, आदेश बांदेकरांनी ट्रोलर्सला सुनावले खडे बोल

यापुढे आदेश बांदेकर म्हणाले, “माझ्या सिनेसृष्टीच्या करिअरच्या सुरुवातीला ८० ते ९० च्या काळात मी मंथन नावाचा एक कार्यक्रम करत होतो. त्यावेळी माझा मित्र अजित गायकवाड हे या कार्यक्रमाचे निर्माते होते. एक दिवस दिघे साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं. त्यांनी गडकरी रंगायतानमध्ये आमचा कार्यक्रम पाहिला आणि त्यांना तो खूप आवडला. या कार्यक्रमाचा एक प्रयोग आमच्या एका संस्थेसाठी करायचा, असं त्यांनी सांगितलं. मी तो कार्यक्रम केला. त्याला सर्वजण उपस्थित होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर मला ज्या व्यक्तीकडून मानधन मिळणार होते ती व्यक्ती बाहेरगावी फिरण्यासाठी गेली होती. पैसे नसल्याने आम्ही अडकून पडलो. आम्हाला समोरच्याला पैसे द्यायचे होते. त्यानंतर मी घाबरत घाबरत दिघे साहेबांकडे गेलो.”

“आई बाबा मी दररोज…”, आदेश बांदेकरांच्या लेकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“मला बघताच आनंद दिघे यांनी मला तेव्हा अत्यंत आदरपूर्वक बसायला सांगितले आणि चहाची सोय केली. त्यानंतर त्यांनी काय झालं, याबद्दल चौकशी केली. त्यावेळी आम्ही त्यांना अजूनही कलाकारांना त्यांच्या मानधनाचे पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. आम्ही फोन करतोय पण ते उचलत नाही, असेही आम्ही त्यांनी म्हटले. त्यावेळी त्यांनी ५ मिनिटं थांबायला सांगितलं. त्यांनी जी व्यक्ती पैसे देणार होती त्याला निरोप पाठवला आणि ती व्यक्ती थेट त्यांच्या ऑफिसमध्ये आली.” असेही त्यांनी म्हटले.

“पण ती व्यक्ती येण्याच्या आधीच आनंद दिघे यांनी स्वतःजवळचे पैसे आम्हाला देऊ केले. आनंद दिघेंकडून दिलेला शब्द कसा पाळायचा, हे शिकण्यासारखे होते. एखादा कलावंत आहे आणि त्याचा सन्मान राखला गेला पाहिजे. जरी तो प्रसिद्ध असो किंवा नसो, ही त्यांची भावना मी स्वत: अनुभवली आहे. त्यानंतर आम्हाला त्यांनी ठाण्यातील सर्व कार्यक्रम करण्याची संधी दिली. १९८७ -८८ च्या काळात आम्ही रात्री अपरात्री उशिरापर्यंत कार्यक्रम करायचो, पण त्यावेळीही कुठलीही अडचण आली तरी मला सांगा, असा विश्वासही त्यांनी आम्हाला दिला होता”, असा किस्सा आदेश बांदेकर यांनी सांगितला.

VIDEO : ‘चंद्रमुखी’चा हटके अंदाज, अमृता खानविलकरने चक्क पुणे मेट्रोत धरला ‘चंद्रा’वर ठेका

‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून आनंद दिघेंची ओळख होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास उलगडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor aadesh bandekar get emotional after watch prasad oak as anand dighe dharamveer teaser nrp

ताज्या बातम्या