बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर खान स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार पद्धतीने प्रमोशन केले जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच अभिनेता आमिर खानने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आमिर खानची मुलाखत घेतली. यावेळी आमिर खानने ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाशिवाय विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मुलाखतीत नागराज मंजुळेंनी आमिर खानला एक अभिनेता म्हणून ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या भूमिकेबद्दल वैयक्तिकरित्या काय वाटतं? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना आमिर खान म्हणाला, “एक अभिनेता म्हणून ती कथा आणि त्यातील भूमिका लोकांसमोर यावी, असे मला वाटत होते. मला एक निर्माता आणि अभिनेता म्हणून मनापासून तो चित्रपट करावा असं वाटतं होतं.”

“अन् अचानक माझ्या लक्षात आलं…” आमिर खानने सांगितला आईचा ‘तो’ किस्सा

“लाल सिंग चड्ढा मधील भूमिका फारच वेगळी आणि प्रभावी आहे. यात ती भूमिका पाहिल्यानंतर तुमच्या मनात एक चांगुलपणा जागा होतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात आजूबाजूच्या माणसांबद्दल चांगले, वाईट, राग, प्रेम सर्वच असते. कधी कधी आपल्या मनात फार संवेदनाही जाग्या होतात. आपण फार संवेदनशीलही होतो. तर कधी कधी आपण नम्रही असतो. हे सर्व आपल्यात असते. हा एक असा चित्रपट आहे, जो आपण बघितल्यानंतर आपल्यातील सर्व चांगुलपणा बाहेर येतो. आपल्यात असणारा नम्रपणा, निरागसता आणि भोळेपणा बाहेर येतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला फार सकारात्मकही वाटते”, असेही आमिर खानने सांगितले.

अन्नू कपूर यांना माहीत नाही कोण आहे आमिर खान? पाहा काय म्हणाले अभिनेता

आमिर खान आणि करीना कपूर खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. देशातील तब्बल १०० लोकेशनवर या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे. अद्वैत चंदन यांचं दिग्दर्शन असेलल्या या चित्रपटाची पटकथा एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे.

हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor aamir khan nagraj manjule interview talk about laal singh chaddha movie personally thinking about role nrp
First published on: 08-08-2022 at 00:32 IST