चित्रपटाच्या सेटवर बऱ्याच वेळा कलाकारांना ईजा होते. मात्र, यावेळी एका कलाकाराचे निधन झाले आहे. हॉलिवूड अभिनेता अॅलेक बाल्डविनला नुकतेच ‘रस्ट’ या चित्रपटाच्या सेटवर चुकून गोळी झाडण्यात आली आहे. यावेळी एका सिनेमॅटोग्राफरचा जागीच मृत्यू झाला आणि चित्रपटाचे दिग्दर्शक जखमी झाले आहेत. विशेष गोष्ट म्हणजे ही घटना त्या बंदुकीसोबत घडली, जी चित्रपटात प्रॉप गन म्हणून वापरली जात होती.

ही घटना न्यू मॅक्सिकोत असलेल्या रस्ट या चित्रपटाच्या सेटवर झाली आहे. चित्रीकरणाच्या दरम्यान, अॅलेकने चित्रीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुकीतून गोळी सुटली आणि ती ४२ वर्षीय सिनेमेटोग्राफर हलिना हचिन्सला लागली. हलिनाला लगेच हॅलिकॉप्टरने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. परंतु अर्धा रस्तात तिचे निधन झाले. तर दिग्दर्शक जोएल सूजा यांना देखील या घटनेत दुखापत झाली आहे.

आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नसला, तरी प्रॉप गन किंवा चित्रपटात वापरण्यात आलेली बंदूक खऱ्या गोळ्यांनी भरली होती किंवा कशी होती याचा तपास केला जात आहे. द हॉलिवूड रिपोर्टने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाशी जोडलेल्या एका व्यक्तीने सांगितले की प्रॉपच्या बंदुकीत फक्त खोट्या गोळ्या वापरल्या गेल्या.