Allu Arjun Gives Gift Luxury Car To Wife : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्यांची पत्नी स्नेहा रेड्डी यांनी ६ मार्च रोजी आपल्या लग्नाचा १५ वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवसानिमित्त दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांसाठी भावुक पोस्ट शेअर केल्या. या सेलिब्रेशनला आणखी खास बनवत अल्लू अर्जुनने पत्नीला एक महागडी कार भेट दिली.

६ मार्च या अल्लू अर्जुन अन् पत्नी स्नेहा रेड्डी यांचा लग्नाच्या १५ वा वाढदिवस आणखी एका कारणासाठी खास ठरला, ते म्हणजे याच दिवशी अल्लू अर्जुनचा धाकटा भाऊ अल्लू शिरीषने नयानिका रेड्डीशी हैदराबादमध्ये लग्न केले. त्यामुळे हा दिवस अल्लू कुटुंबासाठी आणखीनच आनंदाचा ठरला.

अल्लू अर्जुनने पत्नीला दिली १.५ कोटींची कार

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन पत्नीला काळ्या रंगाची आलिशान Mercedes-AMG CLE 53 कार भेट देताना दिसत आहे. माहितीनुसार हैदराबादमध्ये या कारची किंमत सुमारे १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अभिनेत्याच्या टीमने कार भेट म्हणून दिल्याचा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

लग्नाच्या वाढदिवसाचं खास गिफ्ट मिळाल्यानंतर स्नेहाने आनंदाने अल्लू अर्जुनच्या गालावर किस केलं आणि सासरे अल्लू अरविंद यांनादेखील मिठी मारली. दरम्यान, स्नेहा रेड्डीने सोशल मीडियावर पतीसाठी एक खास पोस्ट शेअर केली.

पोस्टमध्ये तिनं म्हटलंय, “१५ वर्षांनंतर आपण प्रेमाने भरलेलं असं सुंदर आयुष्य घडवलं आहे. माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असलेलं कुटुंब, घर, आपली दोन सुंदर मुलं आणि असंख्य आठवणींसाठी धन्यवाद. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर मला साथ दिली, प्रत्येकवेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल तुझे आभार. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”

अल्लू अर्जुनच्या टीमने शेअर केला व्हिडीओ

पत्नीच्या या पोस्टवर अल्लू अर्जुननेही प्रतिक्रिया दिली आहे. स्नेहाला त्यानं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत, तसंच तिचे आभार मानले आहेत. तो म्हणाला, “क्यूटी, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्याबरोबरच्या १५ वर्षांच्या प्रवासात तू नसतीस तर हा प्रवास इतका सुंदर झाला नसता.” या पोस्टला अल्लू अर्जुनच्या अनेक चाहत्यांनी तसंच कलाकार मंडळींनीसुद्धा लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

अल्लू अर्जुनसाठी पत्नीने शेअर केली पोस्ट

अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांनी ६ मार्च २०११ रोजी हैदराबादमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. या लग्नाला कुटुंबीयांसह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. दोघांना अयान आणि अरहा ही दोन मुलं आहेत. अरहाने समांथा रूथ प्रभूच्या ‘शकुंतलम’ या चित्रपटात ‘प्रिन्स भरत’ची भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

दरम्यान, अल्लू अर्जुनच्या कामाबाबती बोलायचं झाल्यास, अल्लू अर्जुन शेवटचा Pushpa: The Rise आणि त्याच्या सिक्वेल Pushpa 2: The Rule मध्ये दिसला होता. सध्या तो दिग्दर्शक अॅटिली आणि लोकेश कनगराज यांच्या आगामी चित्रपटांसाठी तयारी करत असून हे चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होतील.