अंकुश चौधरीचा नवा अंदाज | Actor Ankush Chaudhary Cinema drama series Reality amy 95 | Loksatta

अंकुश चौधरीचा नवा अंदाज

सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीला आपण सिनेमा, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळय़ा रूपात भेटलोय.

Ankush Chaudhari
अंकुश चौधरी

सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीला आपण सिनेमा, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळय़ा रूपात भेटलोय. सध्या अंकुशचा अग्निशमन अधिकाऱ्याच्या रूपातला अंदाज सर्वाचंच लक्ष वेधून घेतो आहे. अंकुशचा हा नवा अंदाज कोणत्या सिनेमासाठी नसून ‘स्टार प्रवाह’च्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स’चा या कार्यक्रमासाठी आहे. नृत्याची ओढ असणाऱ्या ४ ते १४ वयोगटातील स्पर्धकांना आपलं टॅलेण्ट सिद्ध करण्यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनी हक्काचा मंच उपलब्ध करून देणार आहे. ‘मी होणार सुपरस्टार’ जल्लोष ज्युनियर्सचा या धमाकेदार डान्स रिॲलिटी शोमध्ये अंकुश पुन्हा एकदा परीक्षकाची जबाबदारी पार पाडणार आहे.

या भव्य रिॲलिटी शोविषयी सांगताना अंकुश म्हणाला, ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा प्रोमो खूप वेगळय़ा पद्धतीने मांडण्यात आला आहे. एका वेगळय़ा अंदाजात मला प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाली. प्रोमोमागचा विचार मला खूपच आवडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली बच्चेकंपनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मंचावर आग लावणार आहे. त्यामुळेच प्रोमोमध्ये मी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याच्या रूपात आहे. या पर्वाचे वेगळेपण म्हणजे स्पर्धकांसोबतच परीक्षकही सादरीकरण करणार आहेत. त्यामुळे या चित्रीकरणाच्या निमित्ताने मी एक नवी स्टेप शिकण्याचं ठरवलं आहे. नृत्य हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी परीक्षक असलो, तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन्’. स्टार प्रवाहच्याच ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री समृद्धी केळकर या शोच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा शो १८ फेब्रुवारीपासून दर शनिवार – रविवारी रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 02:10 IST
Next Story
ॲक्शन एके ॲक्शन