Atul Todankar On Financial Struggle During Brain Hemorrhage : मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे अतुल तोडणकर. आपल्या कामामुळे चर्चेत राहणारा अतुल त्याच्या आजारपणामुळे चर्चेत आला होता. अतुलला २१ जानेवारी २०२४ रोजी ब्रेन हॅमरेजचं निदान झालं होतं.

या आजारपणातून अतुल आता पूर्णपणे बरा झाला आहे. सध्या रंगभूमीवर त्याचे ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ नावाचे नाटक सुरू आहे. या आजारपणाच्या काळात अभिनेत्याला अभिनेते प्रशांत दामले यांनी आर्थिक सहाय्य केले होते. ज्याबद्दल स्वत: अतुलनेच एका मुलाखतीत सांगितले.

आजारपणामुळे उत्पन्नाचे सगळे मार्ग बंद झाले होते – अतुल तोडणकर

राजश्री मराठीशी साधलेल्या संवादात अतुलला इंडस्ट्रीतल्या मैत्रीविषयी विचारण्यात आले. यावेळी अतुल म्हणाला, “आता हे बोललं पाहिजे की, नाही माहीत नाही. आजारपणात माझे आयुर्वेदिकचे उपचार सुरू होते. साताऱ्याला सुयोग दांडेकर डॉक्टर यांच्याकडे मी उपचार घेत होते. त्यांना कळलं तेव्हा त्यांनी ‘ताबडतोड इकडे ये’, असं म्हटलं होतं. पण त्यांचे उपचार खर्चिक असल्याचे मी त्यांना सांगू शकलो नाही. त्यामुळे मी त्यांना ‘हो येईन… येईन…’ असं म्हटलं होतं. कारण – तेव्हा मी तो खर्च देऊ शकणार नव्हतो. आजारपणामुळे उत्पन्नाचे सगळे मार्ग बंद झाले होते. कामच नव्हतं, त्यामुळे पैसे कुठून येणार. तेव्हा मुलगा दहावीला होता, घराचे हफ्ते वगैरे… या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे मी त्यांना आता येऊ शकत नसल्याचे सांगितलं होतं. पण त्यांनीही ‘पैशांचा अजिबात विचार करू नको’, असं म्हटलं होतं.”

माझा सगळा खर्च प्रशांत दामलेंनी उचलला होता – अतुल तोडणकर

यपुढे अतुलने सांगितले, “तिकडे गेल्यानंतर त्यांनी आठ दिवस उपचार केले. ज्यामुळे मला खूप फरक पडला. मी ब्रेन हॅमरेजमधून बरा होऊन आता काम करू शकतोय, यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यानंतर मी त्यांना ‘तुमच्यासाठी काय करू?’ असं विचारलं. त्यावर त्यांनी मी त्यांच्यासाठी एक बाइट (प्रतिक्रिया) द्यावा, असं त्यांनी सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे. पण फक्त बाइट एवढंच… वर्षभरानंतर त्यांनी मला सांगितलं की, तुझ्या आणि माझ्यातला एक दुवा आहे. त्याने या सगळ्या गोष्टी हँडल केल्या आहेत. म्हणजेच माझा सगळा खर्च प्रशांत दामले यांनी उचलला होता. याला काय म्हणायचं?”

मोठा स्टार माझ्यामागे उभा राहतो, हीच ताकद – अतुल तोडणकर

शेवटी अतुल म्हणाला, “एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाच्या ५०० व्या प्रयोगाला प्रशांत दामले यांनी त्यांच्या भाषणात या नाटकातून मला अतुल तोडणकरसारखा मित्र मिळाला असं म्हटलं होतं. मी अवाक झालो होतो. मी ती भावना व्यक्तच करू शकत नाही. इतक्या अनुभवी माणसाकडून मैत्रीच्या नात्याचा उच्चार होणं ही खूप मोठी गोष्ट होती. हे पाठबळ माझ्याकडे आहे. इतका मोठा स्टार तुमच्यामागे उभा राहतो, हीच तुमची ताकद आहे.”