Vijay Kadam Passed Away गेल्या ३५ वर्षांपासून मी, विजय कदम आणि जयवंत वाडकर आम्हा तिघांची घट्ट मैत्री आहे. रंगभूमी-चित्रपट माध्यमातून काम करताना असो वा एकमेकांच्या घरी सणवार, सुखदु:खाच्या गोष्टी अनुभवणं असो आम्ही कायम एकत्र राहिलो. विजय कदम हा माझ्यापेक्षा वयाने आणि कलाकार म्हणून अनुभवानेही मोठा होता. त्यामुळे तो फक्त मित्र नव्हे तर माझा गुरुमित्र होता. उत्कृष्ट अभिनयगुण असलेला आणि अत्यंत अभ्यासू असा विजय कदमसारखा कलावंत नाही. केवळ माझा मित्र आहे म्हणून नाही तर अनेक भूमिका फक्त तोच सहज आणि उत्तम करू शकतो हे माहिती होतं. त्यामुळे एखादं नाटक, चित्रपट वा मालिका यांचं दिग्दर्शन करताना त्याच्यासाठी कोणती भूमिका असेल हे पहिल्यांदा डोक्यात पक्कं व्हायचं. संपूर्णपणे त्याच्यावर विसंबून उत्तम काम होणार या विश्वासानेच आम्ही एकत्र काम केलेलं आहे.

हेही वाचा >>> विजय कदम आणि पल्लवी जोशी यांच्यातील खास नातं तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या…

सन १९८३ च्या सुमारास विजय कदम जेव्हा ‘टूरटूर’ आणि ‘विच्छा माझी पुरी करा’सारखी नाटक करत होता तेव्हा मी अगदीच नवीन होतो. त्यांचं काम बघत बघत मी शिकलो आहे. आम्ही सगळेच चाळीत लहानाचे मोठे झालो. मी, विजय, प्रदीप, जयवंत असे आम्ही सगळे कलाकार चाळीतच वाढलो. चाळीत तुम्हाला असंख्य प्रकारच्या नमुनेदार व्यक्ती जवळून पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. अशापद्धतीने प्रत्यक्ष अनुभव आणि निरीक्षणातून व्यक्तिरेखा जिवंत करण्याची हातोटी ही विजय कदम याच्याकडेही होती. त्याचं वाचन आणि अभ्यास दांडगा होता. पुलंपासून, जी. ए. कुलकर्णींसारख्या मराठीतील प्रतिभावंत साहित्यिकांच्या पुस्तकांचं वाचन तो करायचा. सेटवर चित्रीकरण करत असताना हमखास त्याच्याकडे एकतरी पुस्तक असायचं. पूर्वी वाचनावर भर असायचा. अलीकडच्या काळात नव्या माध्यमांचा उदय झाल्यानंतर वाचनापेक्षा हिंदी – इंग्रजी चित्रपट पाहण्यावर त्याचा भर असायचा. तो आणि त्याची पत्नी पद्माश्री दोघं मिळून चांगल्या चित्रपटांचे संदर्भ द्यायचे. अमूक एखादी गोष्ट तू पाहायलाच हवीस हे त्यांचं सांगणं असायचं. त्या दोघांना संगीताचीही उत्तम जाण होती. त्यामुळे चित्रपट करत असताना त्यांच्यामुळे गाणी करतानाही मदत व्हायची. एक कलाकार म्हणून विलक्षण ताकद त्याच्यात होती.

हेही वाचा >>> विजय कदम यांच्या निधनावर प्रशांत दामलेंची भावुक प्रतिक्रिया, म्हणाले, “परवापर्यंत आम्ही…”

दादा कोंडकेंनंतर ‘विच्छा माझी पुरी करा’सारखं नाटक विजयने एकट्याने पेललं. त्याचे देश-परदेशांत प्रयोग केले. तो आणि सतीश तारे मिळून या नाटकात गण सादर करायचे. चाळीस मिनिटांचा गण हे दोघं सव्वा तास रंगवायचे. अगदी ताज्या राजकीय घटनांचा संदर्भ देत कोपरखळ्या मारलेल्या असायच्या. ते पाहणं म्हणजे कमाल अनुभव होता. मी दिग्दर्शित केलेल्या ‘हलकं फुलकं’ या नाटकातली विजयची भूमिका ही माझी सगळ्यात आवडती भूमिका. विजय कदम आणि रसिका जोशी यांच्या या नाटकात मुख्य भूमिका होत्या. रसिका या नाटकात पाच वेगळ्या व्यक्तिरेखा करायची तर विजय सात व्यक्तिरेखा. कधी ते पती-पत्नी म्हणून कधी बाप-लेक म्हणून अशी एकाच नाटकात वेगळ्या भूमिका ते करायचे आणि प्रेक्षकांना चटकन कळायचं नाही की दोघंच सगळ्या भूमिका करत आहेत. खरंतर माझ्याआधी हे नाटक दुसऱ्या एका दिग्दर्शकाने विजयकडे आणलं होतं. मात्र त्याने नाटकाच्या संहितेत बरेच बदल केले होते. विजयला ते आवडलं नसल्याने त्याने नाही सांगितलं. मी मात्र ते संहिते बरहुकूम बसवलं म्हणून त्याने माझं कौतुक केलं. त्यावेळी त्याच्यासारख्या अनुभवी आणि नावाजलेल्या कलाकाराकडून दाद मिळाली. काही चुकलं तर तेही तो सांगायचा. त्यामुळे आपण जे करतो आहोत ते बरोबर आहे हा विश्वास वाढत गेला. त्याच्यामुळे मी घडलो, असं मी मानतो. बँकेतील नोकरी, चित्रीकरण, नाटकाचे प्रयोग सगळं एकत्र करत असताना आम्ही खूप मजा केली. काम संपल्यावरही एकमेकांशी चर्चा, लक्ष्मीकांतबरोबर चित्रपट करताना उरलेल्या वेळात त्याच्याशी गप्पा, विचारांची, अनुभवाची देवाणघेवाण आम्ही करत होतो. एकमेकांचा द्वेष आम्ही कधी केला नाही. त्यातूनच आम्ही कलाकार आणि माणूस म्हणून समृद्ध होत गेलो.