मी मोठय़ा पडद्यावरचा हिरो

मी मोठय़ा पडद्यावरचा हिरो आहे आणि माझे चित्रपट सामान्य प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीच बनवलेले असतात

करोनाकाळात बॉलीवूडमधील अनेक मोठय़ा कलाकारांच्या चित्रपटांनी प्रदर्शनासाठी ओटीटी माध्यमांची वाट धरली, काही कलाकार मात्र अजूनही ओटीटीपासून फटकू न आहेत. अभिनेता जॉन अब्राहम हा अशा कलाकारांपैकी एक.. त्याचे तीन चित्रपट या वर्षभरात प्रदर्शित होणार आहेत आणि हे तिन्ही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार नाहीत, असे तो ठामपणे सांगतो. जॉनचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहातून झळकतो आहे. मे महिन्यात ईदच्या मुहूर्तावर त्याचा ‘सत्यमेव जयते २’ हा चित्रपट सलमान खानच्या ‘राधे – युवर मोस्ट वाँटेड भाई’शी टक्कर घेणार आहे. शिवाय, त्याचा ‘अ‍ॅक्शन’ हा आणखी एक चित्रपट या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ओटीटी माध्यमे ही कलाकारांसाठी एक मोठी संधी आहे, पण म्हणून मी माझे चित्रपट तिथे प्रदर्शित करणार नाही. मी मोठय़ा पडद्यावरचा हिरो आहे आणि माझे चित्रपट सामान्य प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीच बनवलेले असतात, असे जॉनने सांगितले.

‘ओटीटी माध्यमांमुळे कलाकारांना खूप चांगल्या संधींची कवाडे खुली झाली आहेत. पण ओटीटी माध्यमांवर चित्रपट प्रदर्शित करून मी लोकांचा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघण्याचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही. मला पहिल्यापासूनच मोठय़ा पडद्याचं आकर्षण आहे, मोठय़ा पडद्यावरचा हिरो म्हणूनच मी लोकांसमोर आलो आहे. महिन्याभराचे शुल्क घेणाऱ्या माध्यमांचा मी हिरो नाही’, असे तो स्पष्टपणे सांगतो. मात्र ओटीटीचे त्याला वावडे आहे असेही नाही. लवकरच त्याची सहनिर्मिती असलेला ‘सरदार का ग्रॅण्डसन’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अर्जुन क पूर, नीना गुप्ता, रकु ल प्रीत सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात जॉन पाहुण्या कलाकाराच्या भूमिके त दिसणार आहे. ओटीटीपेक्षा मी कायमच चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी चित्रपटगृहांना प्राधान्य देईन, असे तो म्हणतो. त्याचे कारणही तो स्पष्ट करतो. करोनाकाळात चित्रपट उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसला आहे, या परिस्थितीतून चित्रपट उद्योगाला बाहेर काढायचे असेल तर चित्रपटगृहांच्या व्यवसायाला बळकटी देणे गरजेचे आहे, असे मत तो व्यक्त करतो. करोनाचा संसर्ग वाढतो आहे, तरीही धोका पत्करून अनेक चित्रपटगृह मालक अध्र्या आसनक्षमतेतही चित्रपटगृह चालवण्याचे धाडस करत आहेत. त्यांच्यातला आत्मविश्वास दृढ झाला पाहिजे. लोकांना चित्रपटगृहातील मनोरंजनाचा अनुभव मिळावा, यासाठी सगळ्यांकडूनच प्रयत्न झाले पाहिजेत. याच कारणासाठी निर्माते-कलाकार यांनी चित्रपटगृहातूनच चित्रपट प्रदर्शित करण्यावर जोर दिला पाहिजे असे त्याला वाटते.

‘माझ्यासाठी चित्रपटांच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे हाच खरा आनंद आहे. कलाकार म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे ही आमची जबाबदारी आहे, त्याचसाठी आम्ही या व्यवसायात आहोत’, असे सांगणाऱ्या जॉनने चित्रपट यशस्वी होईल की अयशस्वी हे त्याच्यासाठी महत्त्वाचे नसल्याचे सांगितले. मला फक्त चांगले चित्रपट करायचे आहेत. ते हिट होतील की नाही याचा विचार मी करत नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात आपण यशस्वी झालो आहोत का याचा विचार मी जास्त करतो. मोठय़ा पडद्यावरचे मनोरंजन काय असते हे आपण विसरलो आहोत. रुपेरी पडदा, त्याची जादू, या पडद्यावरचे हिरो आणि त्यांची हिरोगिरी या सगळ्याची मजा आपण हरवून बसलो आहोत. लोकांना हा आनंद परत मिळाला पाहिजे आणि तो त्यांना ‘मुंबई सागा’ या चित्रपटातून अनुभवायला मिळेल, असा विश्वासही त्याने व्यक्त के ला.

‘मुंबई सागा’ हा चित्रपट ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील मुंबईत बोकाळलेल्या गुंडगिरीवर आधारलेला आहे. या चित्रपटात मुंबईवर सत्ता गाजवू पाहणाऱ्या अमर्त्य रावची भूमिका तो करतो आहे. त्याने याआधीही ‘शूटआऊट अ‍ॅट वडाला’ आणि ‘रेस २’ सारख्या चित्रपटांमधून खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. मला खलनायकी भूमिका साकारायलाही आवडतात, असे तो म्हणतो. तीच तीच नेहमीची साचेबद्ध कथा असेल तर लोक कंटाळतात. त्यांना काही तरी वेगळे हवे असते, तुम्ही जर एखाद्या वेगळ्या संकल्पनात्मक कथेवर आधारित चित्रपट करत असाल तर तो साधेपणाने के ला तरी चालतो. अन्यथा खलनायकी भूमिकाही लोकांना पाहायला आवडतात, त्याचे एक कारण म्हणजे बंडखोरी आपल्या सगळ्यांमध्ये असतेच. हा बंडखोर चेहरा लोकांना जास्त जवळचा वाटतो, असे निरीक्षण त्याने नोंदवले.

जॉन कलाकार आहे, तसाच तो निर्माताही आहे. चित्रपट निर्मितीच्या व्यवसायातील नफ्या-तोटय़ाचे गणित त्याने जवळून अनुभवलेले आहे. त्यामुळे आत्ताच्या अवघड काळात निर्मात्यांसमोरच्या अडचणीही तो समजून घेऊ शकतो. एक कलाकार म्हणून माझ्या चित्रपटाने चांगली कमाई करावी, निर्मात्यांचे नुकसान होणार नाही एवढा पैसा तरी चित्रपटाला मिळाला पाहिजे, असे त्याला वाटते. वर्षभरानंतर आता कु ठे निर्माते डोके  वर काढून चित्रपट प्रदर्शनाची तयारी करू पाहतायेत, तारखा जाहीर करतायेत.. पण पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने निर्मात्यांची चिंताही वाढली आहे, असे तो म्हणतो. पुढे काय होणार, याची कोणालाच कल्पना नाही आहे. त्यातल्या त्यात आपले चित्रपट, त्यांचा व्यवसाय कसा आणि किती होणार, याची चिंता सगळ्याच कलाकारांना सतावते आहे, असे तो सांगतो. तरीही एकमेकांना धीर देत चित्रपट प्रदर्शनाची तयारी सुरू आहे हे चित्रही सकारात्मकच असल्याचे तो आवर्जून सांगतो.

ओटीटी माध्यमांमुळे कलाकारांना खूप चांगल्या संधींची कवाडे खुली झाली आहेत. पण ओटीटी माध्यमांवर चित्रपट प्रदर्शित करून मी लोकांचा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघण्याचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही. मला पहिल्यापासूनच मोठय़ा पडद्याचं आकर्षण आहे, मोठय़ा पडद्यावरचा हिरो म्हणूनच मी लोकांसमोर आलो आहे. महिन्याभराचे शुल्क घेणाऱ्या माध्यमांचा मी हिरो नाही.

जॉन अब्राहम

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Actor john abraham chooses theaters over ott zws