देशात करोनाचा वेग मंदावला आहे. दैनंदिन रुग्ण संख्या कमी होत असताना अभिनेते आणि नेते कमल हासन यांना करोना झाल्याचे समोर आले आहे. कमल हासन हे काही कारणास्तव अमेरिकेला गेले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांना करोनाची काही लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर त्यांनी करोना चाचणी करताच ती पॉझिटिव्ह आली आहे.

कमल हासन यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली आहे. त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतल्याची माहिती दिली आहे. ‘मी अमेरिकेला जाऊन आल्यानंतर मला कफाचा थोडा त्रास होऊ लागला. मी करोना चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. पण मला जाणवले आहे की करोना अजून गेलेला नाही आणि माझी सर्वांना विनंती आहे की काळजी घ्या’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.
आणखी वाचा : ‘नाईट ड्रेस घालून आलीस का?’, कपड्यांमुळे करीना कपूर खान पुन्हा झाली ट्रोल

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आता एकूण १,२२,७१४ सक्रिय रुग्ण शिल्लक आहेत. शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १०,३०२ रुग्णांचीन नोंद करण्यात आली होती तर २६४ जणांना आपला जीव गमवावा लागला. देशातील करोनामधून बरे होण्याचा दर ९८.२९ टक्के आहे. देशात आतापर्यंत एकूण ३,३९,२२,०३७ लोक करोनातून बरे झाले आहेत. त्याच वेळी, ४,६५,६६२ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय देशात आतापर्यंत एकूण ३,४५,१०,४१३ करोना रुग्ण आढळले आहेत.

लोकांना करोनापासून वाचवण्यासाठी भारत सरकार सातत्याने करोना लसीकरण मोहीम राबवत असून, त्याअंतर्गत आतापर्यंत १,१६, ५०, ५५, २१० लसी देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. शनिवारी ६७ लाख २५ हजार ९७० डोस देण्यात आले.