‘लागीर झालं जी’ मालिकेत भैयासाहेब हे खलनायकाचं पात्र साकारत घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे किरण गायकवाड. आपल्या सहजसुंदर अभिनयाने खलनायकाच्या भूमिकेतूनदेखील त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. भैयासाहेबच्या भूमिकेनंतर तो झी मराठी वाहिनीच्या ‘देवमाणूस’ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला होता. या मालिकेत साकारलेली डॉ. अजित कुमार देव ही भूमिका विशेष गाजली आणि अभिनेता किरण गायकवाडला एक वेगळी ओळख मिळाली. आता मात्र हा अभिनेता कोणत्याही मालिकेतील भूमिकेमुळे नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत किरण गायकवाडने आपल्याला नैराश्याचा सामना करावा लागल्याचे म्हटले आहे. तुझं आयुष्य बदलवणारी कोणती गोष्ट ठरली, असं तुला वाटतं? या प्रश्नाला उत्तर देताना किरण गायकवाडने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितले आहे. तो म्हणतो- “माझं लग्न ठरलं होतं. सहा महिने झाले होते, माझं सगळं प्लॅनिंग झालेलं. कधी काय करायचंय, हे आमचं घर असेल, आमच्या नवरा-बायकोचा फोटो या भिंतीवर असेल, असं सगळं मी ठरवलं होतं. त्या सहा महिन्यांत आम्ही तीन वेळा भेटलो असू. एक दिवस मला कुणाचा तरी मेसेज आला आणि मला समजलं की, माझ्या बाबतीत डबल डेटिंग (एकाच वेळी दोघांना डेट करणे)चा प्रकार झाला. त्यानंतर बरेच दिवस मी नैराश्याचा सामना करीत होतो. गोळ्या वगैरे चालू होत्या. नैराश्य मी फार जवळून बघितलं आहे. पण त्या प्रवासातही मजा आहे”, असे त्याने म्हटले आहे.

हेही वाचा: “हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी मला कधी…”, २१ वर्षांपासून सिनेसृष्टीत असलेल्या नेहा धुपियाला अजूनही करावा लागतोय संघर्ष

नैराश्यातून बाहेर कसा पडला, या प्रश्नाला उत्तर देताना त्याने म्हटले की, माझ्या हातात काम होतं, त्यावेळी चौक या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. त्यामुळे मी जास्त अडकलो नाही. याचा अर्थ असाही नाही की, मी त्यातून संपूर्णपणे बाहेर पडलो. मनात कुठेतरी हे चालू असायचं. पण, एकदा ठरवलं, यातून बाहेर पडायचं आहे, किती दिवस यामध्ये अडकून राहणार. झालं त्या मुलीचं लग्न, आता मी कशाला तिथेच अडकून राहू हा विचार केला आणि बाहेर पडलो.

नैराश्याबद्दल बोलताना त्याने म्हटले की, आपल्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लोक खूप आहेत. मी आता काय सांगायला गेलो तर, लोक त्यावर, याचं काहीतरी चुकलं असेल, असं म्हणणार. त्यामुळे माणसांकडे व्यक्त होणं थांबवलं आहे. मित्र-मैत्रिणींजवळही व्यक्त होता येत नाही. म्हणून मानसोपचार तज्ज्ञांची गरज वाढली आहे. त्यांच्याजवळ जाऊन व्यक्त व्हावं लागतं. आपण जेव्हा नैराश्यात असतो, तेव्हा आपल्यालादेखील माहीत असतं की, हे चुकीचं आहे; पण त्यावेळी दुसऱ्या कोणीतरी सांगणं गरजेचं असतं की, ही वेळही जाईल. कारण-त्यावेळी आपण कोलमडून गेलेलो असतो.