मुंबई : अभिनेता महेश ठाकूर यांना त्यांच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादाच्या न्यायालयीन प्रक्रियेबाबत खोटी माहिती देऊन साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ऑगस्ट २०२१ पासून आरोपी मयांक गोयल हा ठाकूर यांच्या संपर्कात होता. त्याने त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच ठाकूर यांच्या मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादाप्रकरणी उच्च व सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केल्याचे त्यांना खोटे सांगितले. त्यानंतर   मालमत्तेसंदर्भात शासकीय कार्यालयात, खासगी कार्यालयात पुरावे गोळा करण्यासाठी पैसे खर्च झाले, असे भासवून ठाकूर यांच्या ओळखीच्या इतर लोकांच्या बँक खात्यात ऑनलाइन व रोख स्वरूपात पाच कोटी ४३ लाख रुपये जमा केले. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील कामकाजाची चित्रफीत तयार करून गोयल याने ठाकूर यांची फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यावर ठाकूर यांनी मंगळवारी या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवली.