भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात यशस्वी दाक्षिणात्य अभिनेत्यांपैकी एक म्हणजे मामूटी होय. गेल्या अनेक दशकांपासून ते आपल्या अभिनयाने समकालीन आणि नवीन पिढीतील कलाकारांसमोर एक आदर्श ठेवत आहेत. त्यांना आतापर्यंत तीन वेळा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. हा बहुमान मिळवणारे ते भारतातील दुसरे कलाकार आहेत. मामूट यांनी मल्याळम, तमिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधील ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

१९७१ मध्ये ‘अनुभवंगल पालिचकल’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली होती, पण त्यात त्यांना क्रेडिट मिळालं नव्हतं. १९८० मध्ये ‘विल्कन्युडू स्वप्नंगल’ मध्ये त्यांनी काम केलं. पडद्यावर पदार्पण करून ५५ वर्षे झाली असली, तरी मामूटी आजही यशाच्या शिखरावर आहेत. नवनवीन प्रयोग करून ते तरुण पिढीतील कलाकारांनाही तगडी टक्कर देत आहेत. गेल्या चार वर्षांत ‘कालमकावल’, ‘भ्रमयुगम’, ‘काथल – द कोर’, ‘नन्पकल नेरथु मयक्कम’, ‘रोर्शॅक’ आणि ‘पुळू’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

पाच दशकांनंतरही अभिनयावर तितकेच प्रेम

इतकी प्रसिद्धी आणि यश मिळाल्यावरही ते थांबत का नाहीत? त्यांना आता या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याची कोणतीही गरज उरलेली नाही. मग तरीही ५० वर्षांनंतरही ते आपल्या कामावर इतकं प्रेम कसे करतात? ‘द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया’शी बोलताना मामूटी म्हणाले, “हा मानवी स्वभाव आहे.” आता सुरक्षित आणि आरामदायी आयुष्य जगण्यासाठी त्यांना जास्त पैशांची गरज नाही, पण ते फक्त आवडीपोटी काम करत आहेत.

“राजकारणी ९० किंवा १०० वर्षांचे झाल्यानंतरही त्यांना राजकारणात का राहावंसं वाटतं? मुकेश अंबानी अजूनही इतके पैसे का कमवत आहेत? हे सर्व त्यांच्या स्वतःसाठी नाहीये… ते कमवत असलेला सगळा पैसा ते स्वतः वापरणार नाहीत. हे सर्व त्यांना त्यातून मिळणाऱ्या आनंदासाठी असते. मी इथे स्वतःची तुलना अंबानींशी करत नाहीये. मला फक्त इतकंच सांगायचंय की, हा मानवी स्वभाव आहे. तुमच्याकडे जे काही आहे, त्यापेक्षा जास्त मिळवण्याची इच्छा तुम्हाला असते. यालाच ‘लोभ’ म्हणतात,” असं मल्याळम सुपरस्टार मामूटी म्हणाले.

अनेकांना वाटतं की रंगमंचावर काम करताना मृत्यू व्हावा

अनेक कलाकारांचं आपल्या अभिनयावर इतकं प्रेम असतं की रंगमंचावर काम करत असतानाच आपला मृत्यू व्हावा, असं त्यांचं स्वप्न असतं. हा मुद्दा मांडताना मामूटी म्हणाले की, त्यांच्यासाठी अभिनय हा श्वासासारखा असतो. “एखादा अत्यंत अशक्त माणूस जो आता हलूही शकत नाही, पण जो कधीकाळी खूप चांगला अभिनेता होता, त्याला जर तुम्ही एखाद्या भूमिकेसाठी बोलावलं, तर तो नक्की येईल आणि सर्वोत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करेल,” असं मत मामूटी यांनी मांडलं.

मामूटी यांनी सांगितली एम.आर. राधा यांची आठवण

मामूटी यांनी तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी एम.आर. राधा यांची एक आठवण सांगितली. राधा जेव्हा शारीरिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत होते आणि त्यांना चालण्यासाठी दोन माणसांच्या आधाराची गरज लागायची, तेव्हाही कॅमेऱ्यासमोर येताच त्यांच्यात कमालीची ऊर्जा संचारत असे. “ते खूप अशक्त असतानाही लोक त्यांना वेगवेगळ्या भूमिकांसाठी विचारत असत. ते सेटवर एका कोपऱ्यात बसून राहायचे आणि जेव्हा दिग्दर्शक त्यांना शॉटसाठी बोलवायचे, तेव्हा दोन लोक त्यांना धरून आणायचे. दिग्दर्शकाने ‘स्टार्ट कॅमेरा’ म्हणेपर्यंत ते लोक त्यांना घट्ट धरून ठेवत. पण ‘ॲक्शन’ शब्द ऐकताच ते लोक त्यांना सोडायचे आणि राधा पूर्ण ताकदीनिशी आपला अभिनय सादर करायचे. असे अनेक महान कलाकार होऊन गेले आहेत,” असं मामूटी म्हणाले.

मामूटींचे आगामी चित्रपट

मामूटी शेवटचे जितिन के. जोस यांच्या ‘कालमकावल’ (२०२५) या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसले होते. सध्या ते दिग्दर्शक महेश नारायणन यांच्या ‘पेट्रियट’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटात १७ वर्षांनंतर मामूटी आणि सुपरस्टार मोहनलाल पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात नयनतारा, फहद फासिल, कुंचाको बोबन, दर्शना राजेंद्रन, रेवती, राजीव मेनन आणि झरीन शिहाब यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘पेट्रियट’ १ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.