मल्याळम अभिनेते मनू वर्मा व त्यांची पत्नी सिंधू वर्मा यांचा २५ वर्षांचा संसार मोडला आहे. मनू वर्मा व सिंधू वर्मा घटस्फोट घेणार आहेत. दोघेही दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत, अशी माहिती मनू वर्मा यांनी स्वतःच दिली आहे. घटस्फोट सध्या न्यायालयात विचाराधीन आहे. अद्याप कायदेशीररित्या घटस्फोट झालेला नाही, असंही मनू वर्मा यांनी नमूद केलं.
मनू वर्मा हे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते जगन्नाथ वर्मा यांचे पुत्र आणि प्रसिद्ध जाहिरात निर्माते प्रकाश वर्मा यांचे चुलत भाऊ आहेत.
एकत्र येण्याची शक्यता खूपच कमी – मनू वर्मा
“मी आणि माझी पत्नी वेगळे राहत आहोत. मात्र, आमचा अजून कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. आम्ही पुन्हा एकत्र येण्याची शक्यता खूपच कमी आहे. आम्ही प्रेमात पडलो आणि त्यानंतर एकत्र आयुष्य जगू लागलो, असं म्हणण्याला आता काहीच अर्थ उरलेला नाही. कारण आमच्यापेक्षा जास्त एकमेकांवर प्रेम असणारी आणि एकत्र राहिलेली अनेक जोडपी विभक्त झाली आहेत. खरं तर किमान दोन-तीन वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही प्रेमात होतो आणि एकत्र होतो. पण नात्यात दुरावा यायला जास्त वेळ लागत नाही,” असं मनू वर्मा यांनी ‘मूव्ही वर्ल्ड मीडिया’शी बोलताना सांगितलं.
वेगळं होणं चांगलं – मनू वर्मा
मनू वर्मा पुढे म्हणाले, “जेव्हा नात्यात एकमेकांशी जुळवून घेणं शक्य नसतं, तेव्हा वेगळं होणंच चांगलं. उगाच एकत्र राहून संघर्ष करायची गरज नाही. एकत्र राहिल्याने अडचणी आणखी वाढल्या तर? तसं का करायचं? त्यापेक्षा वेगळं व्हायचं. परदेशात असंच असतं. तिथे वेगळे झाल्यानंतरही लोक मैत्री टिकवून ठेवतात. आपल्याकडे तसं झालं तर चांगलं. पण तसं झाल्यास कदाचित घटस्फोटांचे प्रमाण वाढेल. वेगळे झालेल्या लोकांनी मैत्री टिकवून ठेवण्यात काहीच गैर नाही. पण केरळमध्ये तसं नाही. एकदा लोक वेगळे झाले की त्यांच्यातलं सगळं संपतं.”

मनू व सिंधू वर्मा यांना ३ अपत्ये आहेत
मनू वर्मा व सिंधू यांना तीन अपत्ये आहेत. त्यांचा मोठा मुलगा अमेरिकेत आयटी इंजिनिअर म्हणून काम करत आहे, तर दुसरा मुलगा बंगळुरूमध्ये आहे. “आम्हाला तिसरी मुलगी आहे आणि तिला प्रकृतीच्या समस्या आहेत,” असं मनू वर्मांनी सांगितलं.
मनू वर्मा हे ‘कदमत्ताथु कथनार’, ‘पुक्कलम वरवाई’ आणि ‘कुमकुमाचेप्पू’ मालिकांसाठी ओळखले जातात. तसेच त्यांनी मामूट्टी यांचा ‘नीलागिरी’ आणि जयरामचा ‘नारानाथू थंपुरन’सह आणखी काही चित्रपटांमध्ये काम केलंय. तर त्यांची पत्नी सिंधू वर्मा, ‘इथो जन्म कल्पनातील’ आणि ‘पंचाग्नी’ यांसारख्या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. तिने मामूट्टीच्या ‘सीबीआय 5: द ब्रेन’ आणि ‘आर्थम’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय.
