हॉलिवूडचा लोकप्रिय गायक मार्क अँथनीच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी तो लवकरच त्याच्या आठव्या बाळाचे स्वागत करणार आहे. त्याची २६ वर्षांची पत्नी नादिया फरेरा गरोदर आहे. दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवशी ही आनंदाची बातमी शेअर केली. मार्क व नादिया यांचे एकत्र हे दुसरे बाळ असेल.
मार्क अँथनी आणि नादिया फरेरा यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. या फोटोत तिचा नवरा आणि मुलाने तिच्या पोटावर हात ठेवला आहे. “लग्नाचा तिसरा वाढदिवस!! Marquitoआता मोठा भाऊ होणार आहे,” असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं. यापूर्वी नादियाने २०२३ मध्ये मुलाला जन्म दिला होता.
नादिया व मार्क यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केल्यावर सेलिब्रिटी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मार्क अँथनीचं हे आठवं बाळ असून नादियाबरोबरचं त्याचं दुसरं बाळ असेल.
कोण आहे मार्क अँथनी?
मार्क अँथनीचे पूर्ण नाव मार्को अँटोनियो मुनिझ आहे. १६ सप्टेंबर १९६८ रोजी जन्मलेला मार्क हा अमेरिकन गायक आणि अभिनेता आहे. त्याच्या करिअरमध्ये त्याने ४ ग्रॅमी पुरस्कार, ८ लॅटिन ग्रॅमी पुरस्कार आणि २९ लो न्यूस्ट्रो पुरस्कार जिंकले आहेत. २०१४ पर्यंत, मार्कने जागतिक स्तरावर १२ मिलियनहून जास्त अल्बम विकले होते.
नादिया फरेरा कोण आहे?
नादिया तमारा फरेराचा जन्म १९९९ साली झाला. ती पॅराग्वेची फॅशन मॉडेल आहे. तिने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या. ती मिस युनिव्हर्स पॅराग्वे 2021 होती. २०१५ पासून नादिया फॅशन विश्वात सक्रिय आहे.
मार्कचे आधीचे विवाह व अपत्ये
मार्कची सर्वात मोठी मुलगी ३२ वर्षांची आहे. तिचा जन्म १९९४ साली मार्कची गर्लफ्रेंड डेबी रोसाडोपासून झाला होता. नंतर त्याने चेस मुनिझ नावाच्या मुलाला दत्तक घेतलं. मार्कने १९९६ ते १९९८ या काळात अभिनेत्री क्लॉडेट लाली हिला डेट केलं, दोघांनी साखरपुडा केला. मग ते वेगळे झाले. त्यानंतर २००० मध्ये त्याने मिस युनिव्हर्स डायनारा टोरेसशी लग्न केलं. या जोडप्याला क्रिस्टियन मार्कस मुनिझ हा मुलगा आहे. या जोडप्याचा दुसरा मुलगा, रायन एड्रियन मुनिझचा जन्म २००३ मध्ये झाला. मार्कने २००४ मध्ये जेनिफर लोपेझशी लग्न केलं. जेनिफरने २००८ मध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. मार्क आणि जेनिफर २०११ मध्ये वेगळे झाले. २०१४ मध्ये मार्कने मॉडेल शॅनन डी लिमाशी लग्न केलं. दोघे २०१६ मध्ये वेगळे झाले. नंतर २०२२ मध्ये मार्क व नादिया डेट करू लागले. २०२३ मध्ये त्यांनी लग्न केलं आणि आता ते त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहेत.

