एखादा कलाकार दोन-तीन भाषांपेक्षा जास्त भाषांतील चित्रपटातून भूमिका साकारू लागला की प्रश्न पडतो, त्याला इतक्या भाषा खरंच येतात का? त्याला किती भाषांच्या चित्रपटासाठी दुस-याच्या आवाजात ‘डबिंग’ची साथ मिळते?
मुरली शर्मा मात्र त्याबाबत, नशिबवान आहे. ‘सिंघम’ चित्रपटातील भ्रष्ट पोलिस इन्स्पेक्टर पाटकर या भूमिकेमुळे प्रकाश झोतात आलेला मुरली शर्मा किती भाषांतील चित्रपटातून भूमिका साकारतो आहे माहित्येय? हिंदी तर झालेच, त्यासह मराठी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अशा एकूण सात भाषांतील चित्रपटातून त्याची घोडदोड सुरू आहे. ‘अजिंठा’ आणि ‘विजय असो’ या दोन मराठी चित्रपटातून भूमिका साकारलेला मुरली शर्मा त्ब्बल दहा तेलगू चित्रपटातून चमकला आहे.
आता एव्हढ्या भाषा त्याला कशा येतात?
त्याची आई तेलगू भाषिक आहे. त्यामुळे त्याला ती भाषा येणे स्वाभाविक आहे. वडाळ्याच्या शाळेत शिक्षण घेत असताना तमिळ भाषिक मित्रांमुळे त्याला त्या भाषेची ओळख आहे. तर पत्नी अश्विनी काळसेकर महाराष्ट्रीय असल्याने मुरलीला मराठी बोलता येवू लागलीय (आपल्या जावयाला मराठी बोलता येवू लागली म्हणून त्याचे सासरे अनिल काळसेकर सुखावले). हिंदी आणि इंग्रजी भाषांवर मुरलीचे प्रभूत्व आहे. त्याचे कन्नड भाषेचे संवाद मात्र दुस-याच्या आवाजात डब करावे लागतात.