नवी दिल्ली : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विषयी वादग्रस्त व्यक्तव्य केल्यानंतर झालेल्या वादग्रस्त परिस्थितीबाबत हिंदी चित्रपटसृष्टीवर तीन दशके राज्य करणारे सलमान, शाहरूख आणि अमिर खान यांनी पाळलेल्या मौनावर प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी टीका केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शाह म्हणाले की, कोणतीही भूमिका मांडली, तर ते खूप काही गमावू शकतात, ही परिस्थिती त्यांच्या मौनावळीमागे आहे. देशात कृतक देशभक्तीचे वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

या तीन अभिनेत्यांप्रमाणे माझी स्थिती नाही. वादग्रस्त विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली तर आपले नुकसान होईल, असे त्यांना वाटत असावे. पण या पवित्र्यामुळे हे तिघे आपल्या आंतरात्म्याची कशी समजूत घालतील, हा प्रश्न आहे. शाहरूख खानचा मुलगा आर्यन याचे अमली पदार्थप्रकरणात नाव पुढे आले होते, याचाही शाह यांनी उल्लेख केला. शाहरूख खानने या प्रकरणात मौन बाळगून यातना सहन केल्या, हे प्रशंसनीय आहे, असे ते म्हणाले.

काश्मीरी हिंदूंबाबत जे काही घडले, त्याचे काल्पनिक चित्र ‘द कश्मीर फाईल’ चित्रपटामध्ये  दाखवण्यात आले होते. सरकार या चित्रपटाला पाठिंबाही देत आहे. त्यामुळे बेगडी आणि कृतक देशभक्तीचे वातावरण तयार झाले आहे, असा उल्लेखही त्यांनी केला.

ज्यांनी विरोधात वक्तव्य केले त्यांना त्याचे उत्तर मिळाले आहे. सोनू सूद यांच्यावर छापा पडला होता. या घटनाक्रमानुसार पुढील क्रमांक माझा असू शकतो.  असेच होईल किंवा नाही, याबाबत काहीही सांगता येत नाही. पण, त्यांना माझ्याकडे काहीही सापडणार नाही.नसीरुद्दीन शाह