भोजपुरी सिनेमाचा सुपरस्टार दिनेश लाल यादव म्हणजेच ‘निरहुआ’ त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. लग्नाला २६ वर्षे झाली आहेत, पण पत्नीवर कधीच प्रेम नसल्याचं त्याने म्हटलंय. मंशा यादवबरोबरचं लग्न बळजबरीने झाल्याचं वक्तव्य निरहुआने केलं आहे. त्याच्या या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

‘डिजिटल कॉमेंट्री’ला दिलेल्या मुलाखतीत निरहुआने वैवाहिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. निरहुआला लग्न करायचं नव्हतं, त्याला करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं, पण त्याच्या आई-वडिलांनी त्याचं ऐकलं नाही. त्याने पालकांना थोडं थांबायला सांगितलं, पण ते तयार झाले नाही. लग्नाचा आजही पश्चात्ताप होतोय. आई-वडिलांनी इच्छेविरूद्ध लग्न लावून दिलं, असंही त्याने म्हटलं आहे. निरहुआ म्हणाला, “तुमचा जोडीदार असा असावा, ज्याच्यावर तुमचे प्रेम असेल, पण माझ्या बाबतीत तसं घडलं नाही.” आपण पत्नीला आणि मुलांनाही सांगितलंय की या नात्यात कधीही प्रेम अनुभवलं नाही. फक्त जबाबदारी व कर्तव्यापोटी या नात्यात असल्याची कबुली निरहुआने दिली आहे.

मुलांबद्दल निरहुआ म्हणाला…

निरहुआने आपल्या मुलांच्या आयुष्याबद्दल त्याची इच्छा काय आहे, तेही सांगितलं. मुलांना जे करायचंय ते करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल, असं त्याने म्हटलं. तसेच ज्यांच्यावर खरोखर प्रेम असेल त्यांच व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड करण्याचा सल्लाही त्याने मुलांना दिला. स्वतःला जोडीदार निवडण्याची संधी मिळाली नव्हती, तसं मुलांच्या बाबतीत घडू नये, असं त्याला वाटतं. “मी माझ्या मुलांना सांगितलंय की, मी त्यांच्या आईवर कधीही प्रेम करू शकलो नाही. मी माझ्या पत्नीलाही हे स्पष्ट सांगितलं आहे. हो, माझे कर्तव्य आहे म्हणून मी ही जबाबदारी पूर्ण करत आहे. मला याबद्दल अपराधीपणा वाटतो. म्हणूनच मी माझ्या मुलांबरोबर असं वागणार नाही. त्यांना कशाचीही सक्ती करणार नाही,” असं निरहुआ म्हणाला.

निरहुआवर सोशल मीडियावर होतेय टीका

निरहुआ यांच्या या विधानांमुळे सोशल मीडियावर तो टीकेचा धनी ठरला आहे. अनेकांच्या मते निरहुआने त्याच्या पत्नीचा जाहीर अपमान केला आहे. तर काही लोकांनी अरेंज मॅरेजमधील सांस्कृतिक दबावाचा मुद्दा समोर करत निरहुआ खरं बोलत असल्याचं म्हटलंय.

निरहुआच्या अफेयरच्या चर्चा

निरहुआ आणि भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे यांच्या अफेयरच्या चर्चा यापूर्वी बरेचदा झाल्या आहेत. पण आता निरहुआने पत्नीवर प्रेम नसल्याचं विधान केल्यानंतर त्याच्या व आम्रपालीच्या नात्याबद्दल पुन्हा लोक चर्चा करू लागले आहेत. मात्र, निरहुआ किंवा आम्रपाली यांपैकी कोणीही या नात्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.