तेलगू अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी अनेक वर्षे सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर २०१४ मध्ये ‘जनसेना पार्टी’ (JSP) स्थापन करून राजकारणात प्रवेश केला. मात्र, आता त्यांनी त्यांच्या आयुष्यबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. पवन कल्याण नक्षलवाद्यामध्ये सामील होणार होते, पण त्यांचे मोठे भाऊ चिरंजीवी यांच्या एका प्रश्नाने त्यांचे आयुष्य बदलले. नेमकं काय घडलं होतं, ते जाणून घेऊयात.

हातात बंदूक घ्यायची इच्छा होती – पवन कल्याण

एएनआयशी बोलताना ते म्हणाले, “माझ्या मनात नक्षलवाद्यांमध्ये सामील होण्याचा विचार सुरू होता. मी १७-१८ वर्षांचा असताना मला हातात बंदूक घ्यायची इच्छा होती. त्याच वेळी माझ्या भावाने (चिरंजीवी) मला काहीतरी सकारात्मक काम कर असं सांगितलं. त्यांनी मला विचारलं की, हा वेड्यासारखा राग तुझ्यात कुठून येतोय? मी म्हणालो, ‘मी अन्यायाबद्दल बोलतोय, आपण तिथे जाऊन या गोष्टी केल्या पाहिजे.’ हे सगळं ऐकून ते खूप काळजीत होते. माझ्या मनात हा विचार वयाच्या १७ व्या वर्षापासून २१ व्या वर्षांपर्यंत होता. या वयात तुम्ही अशा गोष्टींमध्ये सहज वाहून जाऊ शकता.”

पवन कल्याण यांनी सांगितलं की त्यावेळी ते वेड्यासारखे वागत होते. जिथे त्यांना कोणी ओळखत नव्हतं, अशा सभांना ते उपस्थित राहायचे. डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी त्यांनी मुंबईतील शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्येही भाग घेतला होता. ते वेगवेगळे प्रयोग करत होते, पण कोणत्याही गोष्टीने त्यांचं समाधान झालं नाही, त्यांच्या मनात खूप राग होता आणि त्यांना अडकून पडल्यासारखं वाटत होतं.

चिरंजीवी यांनी विचारला होता एकच प्रश्न

“माझ्या मनात अनेक गोष्टींमुळे विचारांचे काहूर माजलं होतं. माझं डोकं सुन्न झालं होतं, मी वेड्यासारखा करत होतो. नेमकी त्याच वेळी माझ्या भावाशी (चिरंजीवी) भेट झाली. त्यांनी मला फक्त एकच गोष्ट विचारली, ‘जर तुझा भाऊ चिरंजीवी नसता, आणि तुझ्यावर कुटुंबाची जबाबदारी असती, तसेच तुझ्या पगारावर कोणीतरी अवलंबून असतं, तर तू हेच पाऊल उचललं असतंस का?’ यावर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी काहीच बोलू शकलो नाही आणि गप्प बसलो,” असं पवन कल्याण म्हणाले.

चिरंजीवी हेच माझे एकमेव हिरो – पवन कल्याण

मार्च महिन्यात ‘उस्ताद भगत सिंग’ या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये पवन कल्याण यांनी आपले भाऊ चिरंजीवी यांना आपले ‘एकमेव हिरो’ म्हटलं होतं. “मला खूप आनंद आहे की माझे भाऊ चिरंजीवी यांनी ‘उस्ताद भगत सिंग’चा ट्रेलर पाहिला आणि त्याबद्दल ट्विट केले. माझ्यासाठी फक्त एकच हिरो आहे, आणि ते म्हणजे मेगास्टार चिरंजीवी. जेव्हा मी त्यांच्या शेजारी उभा असतो, तेव्हा मी स्वतः एक हिरो आहे हे विसरतो,” असं ते म्हणाले होते.

पवन कल्याण हे गेल्या वर्षी ‘हरी हरा वीरा मल्लू’ आणि ‘दे कॉल हिम ओजी’ या चित्रपटांमध्ये झळकले होते. तर २०२६ मध्ये त्यांचा ‘उस्ताद भगत सिंग’ हा चित्रपट आला होता. लवकरच ते दिग्दर्शक सुरेंद्र रेड्डी यांच्या एका सिनेमात दिसणार आहेत.