Fauzi crew vehicle accident : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने पाहत असतात. लकरच प्रभास हॉरर, कॉमेडी व फँटसी यांचे जबरदस्त पॅकेज असलेला फौजी हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ब्रेक लागला आहे. अभिनेता प्रभासच्या आगामी ‘फौजी’ (Fauzi) चित्रपटाच्या सेटवरील एका प्रॉडक्शन वाहनाचा अपघात झाला आहे. काल मंगळवारी (६ मे) हैदराबाद येथील अब्दुल्लापूरमेटजवळ हा अपघात झाला असून, त्यामध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे; तर या अपघातमध्ये पाच जण जखमी झाले आहेत.
‘फौजी’ चित्रपटाचे शूटिंग हे हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटी येथे सुरू आहे. या अपघाती वाहनामधून प्रॉडक्शन टीममधील सहा जण चित्रीकरणाच्या नियोजित ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करत होते. मात्र, अब्दुल्लापूरमेटजवळ वाहनाला भीषण अपघात झाला. यावेळी प्रॉडक्शन टीममधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला; तर इतर पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
‘फौजी’ चित्रपटातील या अपघाती क्रू मेंबर्सला जवळ असणाऱ्या एका खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या अपघातामुळे चित्रपटाचे चित्रीकरण थांबविण्यात आले आहे. त्याचा परिणाम चित्रपटाच्या प्रदर्शित होण्यावर होणार का याची चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांकडून अपघात प्रकरणाचा तपास सुरु
तूपरानपेट पुलाजवळ हा अपघात झाल्यानंतर पोलीसदेखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चोउतुप्पल पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नसून, पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासातून, वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिलेला नाही.
‘फौजी’च्या चित्रीकरणाला स्थगिती
ज्या रस्त्यावर प्रॉडक्शन वाहनाचा हा अपघात घडला, तो रस्ता हैदराबाद-विजयवाडा महामार्गाचा एक भाग आहे. हा एक अत्यंत वर्दळीचा मार्ग असून, पहाटेच्या वेळी या मार्गावर प्रवाशांची वाहने आणि व्यावसायिक वाहनांची गर्दी असते. ‘डेक्कन क्रॉनिकल’च्या वृत्तानुसार, ‘फौजी’ चित्रपटाच्या प्रॉडक्शन वाहनाला अपघात झाल्यानंतर ‘फौजी’चे चित्रीकरण स्थगित करण्यात आले. मृत आणि जखमींची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेवर ‘फौजी’ची कथा आधारित
‘बाहुबली’फेम अभिनेता प्रभास हा पुन्हा एकदा जबरदस्त ॲक्शन आणि थ्रिल असलेला ‘फौजी’ चित्रपट घेऊन येणार आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादानंतर प्रभासच्या कल्की व सालार या चित्रपटांनी चाहत्यांना खूश केले होते. त्यानंतर आता ‘फौजी’ चित्रपटदेखील ब्लॉकबस्टर होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. हनू राघवपुडी यांनी दिग्दर्शित केलेला हा एक ऐतिहासिक चित्रपट असून, त्याची कथा १९४० च्या दशकाची आणि सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील ‘आझाद हिंद सेने’च्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. मैत्री मूव्ही मेकर्स’ निर्मित या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत असून, त्याच्यासह नवोदित अभिनेत्री इमान्वी आहे. तसेच मिथुन चक्रवर्ती, जयाप्रदा व अनुपम खेर अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.
