धर्मवीर हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने खूप लीलया साकारली होती. प्रसाद ओकने ती वेशभुषा केल्यानंतर तो हुबेहुब आनंद दिघेंसारखाच दिसत होता. तसंच त्याचा चित्रपटातला वावर, त्याचे संवाद, त्याचा अभिनय सगळंच लोकांच्या स्मरणात राहिल असंच आहे. हा चित्रपट राजकीय होता, मे २०२२ मध्ये हा चित्रपट आला आणि जून २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. यासंदर्भात कुठल्या राजकीय पक्षाकडून दडपण आलं का? असं विचारलं असता प्रसाद ओकने त्यावर उत्तर दिलं आहे.
नाफा मराठी फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रसाद ओकसह कलाकारांची मुलाखत
तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (NAFA) मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये ‘कॉफी विथ कौशिक’ या कार्यक्रमात मराठी कलाकारांची एकत्रित मुलाखत घेतली. यावेळी मराठी सिनेमाला थेट हॉलिवूडच्या व्यासपिठावर नेणारे दिग्गज दिग्दर्शक नागराज मंजुळे, मराठी सिनेमांसोबतच बॉलिवूड गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मराठी अभिनेता प्रसाद ओक, दिग्दर्शक अभिनेते महेश कोठारे आणि नाफाचे संस्थापक अभिजीत घोलप उपस्थित होते. यावेळी या दिग्गज कलाकारांनी आपापले अनुभव, विचार आणि सिनेसृष्टीतील प्रवास यांवर भाष्य केलं. दिग्गज कलाकारांच्या मनमोकळ्या गप्पांना उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
प्रसाद ओकने धर्मवीरबाबत काय सांगितलं?
धर्मवीर सिनेमा २०२२ मध्ये आला. त्यानंतर महराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली होती. महाविकास आघाडी सरकार पडलं, शिवसेनेत बंड झालं. सिनेमा करताना कलाकार म्हणून राजकीयदृष्ट्या काही त्रास झाला का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा प्रसाद ओकने सांगितलं, मला कधीही कसलंच दडपण आलं नाही किंवा भीती वाटली नाही. मी थेट नाव घेऊन सांगू इच्छितो की उद्धव ठाकरेही माझ्या जवळचे आहेत आणि एकनाथ शिंदेंही जवळचे आहेत. मला कुणीही चित्रपटात ही भूमिका का करतो आहेस? हे विचारलं नाही. मी हा चित्रपट केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी चित्रपट पाहिला.

उद्धव ठाकरे माझ्यासाठी थांबले होते, मलाच गिल्टी वाटलं-प्रसाद ओक
धर्मवीर हा माझ्या कारकिर्दीतला ९६ वा चित्रपट आहे. ही भूमिका करताना आपण जीव ओतून काम केलं नाही, मेहनत केली नाही तर करिअरला काही अर्थ नाही. त्यामुळे मी जीव ओतून काम केलं. मला त्यावेळी पक्ष कुठला, विचारधारा काय वगैरे काही प्रश्न पडला नाही. मी आनंद दिघेंना कधी भेटलो नाही. ऐकीव माहितीतून आलेली माहिती, त्यांचा आवाजही नीटसा माहीत नव्हता. कारण आनंद दिघे फार बोलायचे नाही. सगळं इमॅजीन करुन आम्हाला करावं लागलं. सिनेमा झाल्यानंतर तो जेव्हा उद्धव ठाकरेंनी पाहिला तेव्हा ते माझ्यासाठी खाली रस्त्यावर थांबले होते. प्रसाद येत नाही तोपर्यंत मी त्याचं कौतुक करणार नाही. मलाच गिल्टी वाटलं की माझ्यासाठी उद्धव ठाकरे थांबले आहेत. मी जेव्हा त्यांच्या जवळ गेलो तेव्हा सगळ्यांच्या देखत त्यांनी माझं भूमिकेसाठी कौतुक केलं. तसंच संजय राऊत यांनीही माझं खूप कौतुक केलं अशी आठवण प्रसाद ओकने सांगितली.
