छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अवघे आयुष्य समर्पित करणारे तपस्वी, प्रखर बुद्धिमत्ता, सूक्ष्म विश्लेषण क्षमता आणि इतिहास लेखनाची विलक्षण प्रतिभा लाभलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे पुण्यात निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. अमोघ आणि ओजस्वी वाणीने शिवरायांचा इतिहास जिवंत करणाऱ्या बाबासाहेबांच्या निधनामुळे शिवआख्यान शांतावल्याची भावना राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन सृष्टीमधून व्यक्त केली जात आहे.

बाबासाहेबांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, अभिनेते अमोल कोल्हे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे यांच्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यासारख्या अनेक मान्यवरांनी सोशल नेटवर्किंगवरुन आणि पत्रकांद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र बाबासाहेबांचं निधन झालं त्याच दिवशी आपल्या नाटक दौऱ्यासंदर्भात पोस्ट करणारे अभिनेते प्रशांत दामले यांना एकाने अगदी उद्धटपणे तुम्हाला बाबासाहेबांना श्रद्धांजली देण्यासाठीही तुम्हाला वेळ मिळाला नाही का असा प्रश्न विचारला. मात्र या प्रश्नावर प्रशांत दामले यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नक्की पाहा >> Video: १०० व्या वाढदिवशी बाबासाहेब पुरंदरे म्हणालेले, “आयुष्याची आणखी २-३ वर्षे मिळाली तर एवढीच इच्छा आहे की…”

सोमवारी (१५ नोव्हेंबर २०२१) प्रशांत दामले यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटाकच्या दौऱ्याबद्दल पोस्ट केली होती. “आज रात्री कोल्हापूर, उद्या कऱ्हाड, परवा सांगली. निघालोय मुंबईहून,” असं प्रशांत दामले यांनी पोस्ट केलं होतं. यावर आनंद राज नावाच्या एका व्यक्तीने कमेंट करुन, “बाबासाहेब पुरंदरेंचं निधन झालं आहे, तुम्हाला श्रद्धांजली देण्यासाठी वेळ नाही का?,” असा प्रश्न प्रशांत दामले यांना टॅग करुन विचारला.

नक्की वाचा >> पुरंदरेंच्या निधनानंतर आव्हाड म्हणाले, “माणूस म्हणून कधीच विरोध केला नाही, काही लिखाणावर आक्षेप होता”

सामान्यपणे टॅग केलेल्या कमेंटला प्रशांत दामले अनेकदा उत्तर देतात. मात्र या तिरकस प्रश्नाला प्रशांत दामले यांनी अगदी संयमी उत्तर दिलं. “आनंद राज सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली तरच एखाद्या व्यक्तीबद्दल आदर असतो असं काही नाही. बाबासाहेब आम्हा कलाकारांच्या हृदयात आहे आणि राहतील. त्याचा गाजावाजा का करायचा?,” अशी कमेंट प्रशांत दामले यांनी या प्रश्नाला उत्तर देताना केली. प्रशांत दामले यांच्या या कमेंटला १२०० हून अधिक जणांनी लाईक केलं आहे.

यापूर्वीही प्रशांत दामले यांनी अशाप्रकारे उद्धटपणे प्रश्न विचारणाऱ्या चाहत्यांना कधी संयमी शब्दात तर कधी फिरकी घेत उत्तरं दिल्याची उदाहरणे आहेत. मात्र या गंभीर विषयावरुन डिवचणाऱ्या चाहत्यालाही प्रशांत दामलेंनी दिलेला रिप्लाय अनेकांना पटला असून प्रशांत दामले यांच्या मताशी अनेकांनी समहती दर्शवलीय.