Actor Rahul Arunoday Banerjee drowns near Digha : मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. लोकप्रिय बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी (वय ४२) याचा ओडिशामधील दिघा जवळील तलसारी समुद्रकिनाऱ्यावर बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी २९ मार्च रोजी ‘भोले बाबा पार करेगा’ या टीव्ही मालिकेचे शूटिंग सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शूटिंग संपल्यानंतर राहुल एकटाच समुद्राच्या पाण्यात उतरला होता.

ओडिशामधील दिघा जवळ असलेल्या तलसारी येथे समुद्रात बुडून लोकप्रिय बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी (वय ४२) याचा मृत्यू झाला. रविवारी, २९ मार्च रोजी ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल ‘भोले बाबा पार करेगा’ या मालिकेचं शूटिंग करत होता. शूटिंग संपल्यानंतर तो एकटाच समुद्रात गेला होता. तिथे एका प्रचंड मोठ्या लाटेत तो बुडाला. ही घटना त्याच्या प्रॉडक्शन युनिटच्या समोरच घडली.

राहुल बॅनर्जीबरोबर नेमकं काय घडलं?

“शूटिंग संपल्यावर राहुल समुद्राच्या पाण्यात उतरला, तेव्हा त्याची सह-कलाकार श्वेता मिश्रा किनाऱ्यावरच होती. राहुलचे पाय वाळूत अडकले होते आणि त्याच वेळी एक मोठी लाट आली. लाटेचा वेग इतका जास्त होता की तो स्वतःला सावरू शकला नाही आणि पाण्याबरोबर वाहून गेला. श्वेताने आरडाओरडा करून सर्वांना बोलावलं. क्रू मेंबर्स तातडीने तिथे पोहोचले आणि त्यांनी राहुलला बाहेर काढलं. समुद्राबाहेर काढलं तेव्हा राहुल जिवंत होता. त्याला तातडीने तलसारी बीचपासून १०-१२ किमी अंतरावर असलेल्या दिघा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं,” अशी माहिती सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला दिली.

Award Banner

मालिकेचे प्रोडक्शन मॅनेजर चंद्रशेखर चक्रवर्ती राहुलबरोबर रुग्णालयात गेले होते. ते म्हणाले, “संध्याकाळचे साधारण ५:०० ते ५:३० वाजले होते. तोपर्यंत शूटिंग संपले होते. घड्याळाकडे बघायला वेळच मिळाला नाही. आम्ही एकामागून एक कलाकारांना सेटवरून बाहेर पाठवत होतो. अंबरीश भट्टाचार्य आणि भास्कर चक्रवर्ती यांच्या गाड्या आधीच निघाल्या होत्या. त्याच वेळी मला फोन आला आणि मी तातडीने समुद्रकिनाऱ्याकडे धाव घेतली.”

Bengali Actor Rahul Arunoday Banerjee death by drowning at Digha beach Odisha
अभिनेता राहुल बॅनर्जी (फोटो- सोशल मीडिया)

पोलिसांनी या घटनेबद्दल काय सांगितलं?

‘पीटीआय’ (PTI) ने दिलेल्या वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, पश्चिम बंगाल पोलिसांनी ओडिशामधील पोलिसांशी संपर्क साधला असून या घटनेचा नेमका क्रम काय होता, याचा तपास सुरू केला आहे. “दिघा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आम्ही प्रोडक्शन टीममधील सदस्य आणि प्रत्यक्षदर्शींशी देखील याविषयी बोलत आहोत,” असं पोलीस म्हणाले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी व्यक्त केला शोक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट करून अभिनेत्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. “अत्यंत प्रतिभावान, तरुण आणि लोकप्रिय अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी आता आपल्यात नाही, हे ऐकून मला प्रचंड धक्का बसला आहे आणि खूप दुःख झालंय. हे नेमकं कसं घडलं, याबद्दल मला माहिती नाही. तो माझा आवडता अभिनेता होता. त्याचे कुटुंब, नातेवाईक व चाहत्यांना या दुःखातून सावरायचं बळ मिळो. राहुलचं असं अचानक जाणं हे बंगाली अभिनय क्षेत्रासाठी, तसेच टॉलीवूड आणि टेलीवूडसाठी कधीही भरून न येणारं नुकसान आहे,” असं ममता बॅनर्जींनी पोस्टमध्ये लिहिलंय.