पणजी : शतजन्म मिळाले तरी अभिनेता रजनीकांत म्हणूनच जन्माला.येईन. माझ्या कारकीर्दीला ५० वर्षे झाली, पण अगदी दहा-पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट वाटते. काळ किती वेगाने पुढे सरकतो, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत चित्रपट क्षेत्रातील आपल्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीचे श्रेय ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी आजवर त्यांनी ज्यांच्याबरोबर काम केले त्या लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ या सगळ्यांना दिले.
यंदाच्या महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानाचा पुरस्कार व्हिएतनामी चित्रपट ‘स्किन ऑफ यूथ’ने पटकावला, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शक संतोष डावखर यांना देण्यात आला. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सुवर्णमहोत्सवी वाटचाल पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा खास सत्कार, आगामी धुरंधर चित्रपटाच्या निमित्ताने मंचावर येऊन वातावरणात रंग भरणाऱ्या अभिनेता रणवीर सिंग याचा उत्साह, कांतारा चित्रपटातून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता रिषभ शेट्टी, केंद्रीय माहिती व प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री एल. मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट (इफ्फी) महोत्सवाचा समारोप शुक्रवारी श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमच्या सभागृहात पार पडला.
यावेळी इफ्फी महोत्सवाचे संचालक शेखर कपूर यांच्यासह दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी, चित्रपट निर्माते किरण शांताराम असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार ‘केसरी चॅप्टर २’चे दिग्दर्शक करण सिंग त्यागी यांना देण्यात आला.
