‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये आपल्या अचूक कॉमिक टायमिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजीव ठाकूरने आपल्या बालपणीच्या, गरिबीच्या दिवसांची आठवण सांगितली आहे. खरं तर राजीव त्याबद्दल बोलणं टाळतो, कारण त्या आठवणींचा त्याला त्रास होतो. कॉमेडियन, अभिनेता म्हणून इंडस्ट्रीत यशस्वी होण्याआधी राजीवच्या कुटुंबाची परिस्थिती खूप हलाखीची होती. वैभव मुंजालशी बोलताना राजीवने सांगितलं की तो एका छोट्याशा खोलीत लहानाचा मोठा झाला. एका ४०-वॅटच्या बल्बखाली त्याने अभ्यास केला आणि अत्यंत बिकट परिस्थितीत दिवस काढले.
भावुक झालेला राजीव ठाकूर म्हणाला, “माझा प्रवास ज्या परिस्थितीतून सुरू झाला, त्याची आठवण मला काढायची नाही. आज जर मी लोकांना त्याबद्दल सांगितलं तर कदाचित त्यांना ते खोटं वाटेल. लोक म्हणतात की तुम्ही तुमच्या दुःखाचे ‘स्टँड-अप कॉमेडी’मध्ये रूपांतर केले पाहिजे. मी कधीकधी तसं करतोही, पण ते विनोद करताना होणाऱ्या वेदना इतक्या खऱ्या असतात की बॅकस्टेजला गेल्यावर माझ्या डोळ्यांत पाणी येतं. म्हणूनच मी माझ्या आयुष्यातील त्या काळाबद्दल क्वचितच बोलतो.”
आमचं घर म्हणजे एखादं सार्वजनिक शौचालय – राजीव ठाकूर
राजीव म्हणाला, “माझ्या आई-वडिलांबरोबर अगदी जुन्या हिंदी चित्रपटांसारखं घडलं. त्यांचं लग्न झाल्यावर माझ्या वडिलांना घरातून बाहेर काढण्यात आले. एका रात्रीत ते एका चांगल्या सुखी कुटुंबातून थेट एका खोलीच्या घरात राहू लागले. ती एकच खोली आमची बेडरूम, लिव्हिंग रूम, किचन आणि बाथरुमसुद्धा होती. आम्ही तीन भावंडे तिथेच जन्मलो आणि लहानाचे मोठे झालो. जर घरातील एक जण अंघोळ करत असेल, तर उरलेल्या चौघांना बाहेर वाट पाहत थांबावं लागायचं. मला अनेकदा वाटायचं की आमचं घर म्हणजे एखादं सार्वजनिक शौचालय आहे.”
वडिलांकडे काम नव्हतं, भाडं भरायलाही पैसे नसायचे – राजीव ठाकूर
राजीव ठाकूर पुढे म्हणाला, “माझे वडील बेरोजगार होते. आम्हाला घराचं भाडं देणंही परवडायचं नाही. खोलीत फक्त एकच ४०-वॅटचा बल्ब होता. मला पिवळा प्रकाश अजिबात आवडायचा नाही, कारण मी कधी ट्यूबलाईट पाहिलीच नव्हती. जेव्हा मी दुसऱ्या कोणाच्या घरी जायचो आणि तिथे पांढरा प्रकाश पाहायचो, तेव्हा मला वाटायचं की आपल्या घरात असा पांढरा उजेड कधी येईल?” रात्री ९ वाजता घरमालक लाइट बंद करायचा, त्यामुळे एकतर त्यावेळेत झोपायला लागायचं किंवा पणतीच्या उजेडात बसावं लागायचं, असं राजीवने सांगितलं.
१९८४ मधील दंगलींदरम्यान अमृतसरमध्ये राजीव ठाकूरचे वडील जिथे काम करायचे, तो कारखाना बंद झाला, त्यामुळे घरात स्थिर उत्पन्न यायचं नाही. “आम्ही लिफ्ट नसलेल्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहायचो, त्यामुळे आम्हाला रोज पाण्याच्या बादल्या भरून पायऱ्यांनी वर न्याव्या लागायच्या. माझ्या आईने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कपडे शिवण्याचे काम सुरू केले होते. ती स्वतः ग्राहकांकडून कपडे आणायला आणि शिवून झाल्यावर द्यायला जायची, असं राजीव ठाकूरने नमूद केलं.
मी कल्पनेपेक्षा खूप जास्त मिळवलंय – राजीव कपूर
“कधीकधी मला वाटतं की, मी कधी कल्पनाही केली नव्हती त्यापेक्षा खूप जास्त मिळवलंय. पण जेव्हा तुम्ही आजूबाजूला पाहता, तेव्हा असं वाटतं की कोणीतरी तुमच्यापेक्षा पुढे निघून गेलंय. कदाचित हेच आयुष्य आहे,” असं राजीव ठाकूर म्हणाला.
५० ग्रॅम बटर मिळणं मोठी गोष्ट होती – राजीव ठाकूर
राजीव ठाकूरने ‘हिंदी रश’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत आपल्या गरिबीच्या दिवसांबद्दल सांगितलं होतं. राजीवच्या घरात ५० ग्रॅम अमूल बटरचं पाकीट असायचं, ते तीन भावंडाबरोबर वाटून खावं लागायचं. आम्हाला अजून हवं असायचं, पण घरात जास्त नसायचंच. राजीव जेव्हाही अमृतसरला जातो, तेव्हा तो मुद्दाम जास्त बटर मागतो; कारण ते त्याला लहानपणी क्वचितच मिळायचं.
