Telugu Actor Ranganath Death: अभिनेते रंगनाथ यांच्या निधनाने तेलुगू सिनेमासृष्टीला मोठा धक्का बसला होता. तब्बल ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या रंगनाथ यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी हैदराबाद येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यांच्या निधनानंतर समोर आलेली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी आपली आयुष्यभराची बचत मुलांच्या नावे न करता घरची काळजी घेणाऱ्या मीनाक्षी नावाच्या मदतनीस महिलेच्या नावे केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी खोलीच्या भिंतीवर काय लिहिलं होतं? जाणून घेऊयात.
डेक्कन क्रोनिकलच्या वृत्तानुसार, १९४९ मध्ये मद्रास (आताचे चेन्नई) इथे जन्मलेल्या तिरुमला सुंदर श्री रंगनाथ यांनी श्री व्यंकटेश्वर विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून नोकरी करू लागले. मात्र, पुढे जाऊन त्यांनी अभिनय क्षेत्र निवडले. दिग्दर्शक बापू यांच्या ‘बुद्धिमंतुडू’ (१९६९) या चित्रपटातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. यानंतर त्यांनी ४०पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेते म्हणून कम केलं. पुढे त्यांनी खलनायक आणि चरित्र अभिनेते म्हणूनही इंडस्ट्री गाजवली. आपल्या चार दशकांच्या करिअरमध्ये त्यांनी ३०० हून अधिक चित्रपट केले.
रंगनाथ यांचे गाजलेले चित्रपट
‘जमीनदारुगारी अम्मयी’ (१९७५), ‘अमेरिका अम्मयी’ (१९७६), ‘पंथुलम्मा’ (१९७७), ‘इंतिंती रामायणम’ (१९७९), ‘कैदी’ (१९८३), ‘कलिसुंदम रा’ (२०००), ‘३ दिवारे’ (२००३) आणि ‘निजम’ (२००३) हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
पत्नीच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेले होते रंगनाथ
रंगनाथ यांच्या पत्नीचं २००९ मध्ये निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर रंगनाथ नैराश्यात गेले. त्यांची मुलगी नीरजाने दिलेल्या माहितीनुसार, ते अनेकदा आत्महत्येबद्दल बोलायचे, ज्यामुळे त्यांना समुपदेशनासाठी मानसोपचारतज्ज्ञांकडेही नेण्यात आलं होतं. १९ डिसेंबर २०१५ रोजी हैदराबाद येथील मुशीराबादजवळील गांधीनगर येथील त्यांच्या घरात ते मृतावस्थेत आढळले होते. दुपारी त्यांच्यासाठी जेवण बनवणाऱ्या मीनाक्षी नावाच्या मदतनीसने त्यांना शेवटचं जिवंत पाहिलं होतं. संध्याकाळी काही लोक त्यांना एका कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी आले होते. मात्र आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी जवळच राहणाऱ्या रंगनाथ यांच्या मुलीला कळवलं. मीनाक्षी त्यांचं जेवण बनवून दुपारी निघून गेली, त्यानंतर रंगनाथ घरात एकटेच होते. दरवाजा तोडून आत पाहिलं असता रंगनाथ मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांच्या घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडली नव्हती, पण खोलीतील भींतीवर त्यांनी काही शब्द लिहिले होते.

रंगनाथ यांनी भिंतीवर काय लिहिलं होतं?
रंगनाथ यांनी भिंतीवर ‘Destiny’ (नशीब) असा शब्द लिहिला होता आणि त्याचबरोबर तेलगू भाषेत “माझ्याजवळ असलेले बाँड्स मीनाक्षीला देऊन टाका. तिला त्रास देऊ नका,” असं लिहिलं होतं. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण लिहिलं नव्हतं. पण आत्महत्येपूर्वी त्यांनी त्यांच्या काही मित्रांना ‘गुडबाय’चे मेसेजही पाठवले होते.
मीनाक्षीने पोलिसांना काय सांगितलं होतं?
रंगनाथ यांची पत्नी आजारी असल्यापासून मीनाक्षी त्यांच्या घरी काम करत होती. “ते नियमित टेनिस खेळायचे, पण महिनाभरापासून हात आणि कंबर दुखत असल्याचं सांगून त्यांनी खेळणं बंद केलं होतं. तसेच ते जेवणही वेळेवर करत नव्हते,” अशी माहिती मीनाक्षीने दिली होती.
रंगनाथ यांना नीरजाव्यतिरिक्त आणखी एक मुलगा आणि एक मुलगी आहे, ते दुसऱ्या शहरात राहतात. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर त्यांच्या मुलांनी वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व बचत मीनाक्षीला दिली. “ती गेल्या सहा वर्षांपासून आमच्याकडे काम करत होती, त्यामुळे आम्ही वडिलांची सर्व बचत तिला देऊ,” असं रंगनाथ यांच्या मुलाने सांगितलं होतं.
