‘पोन्नियिन सेल्वन’ फेम दाक्षिणात्य अभिनेता रवी मोहन मागील काही महिन्यांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. रवी मोहनचं १५ वर्षांचं लग्न मोडलं आहे. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान गायिका केनिशा फ्रान्सिसबरोबर त्याचं नाव जोडलं जातंय. घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.
केनिशा ही लोकप्रिय गायिका व मानसशास्त्रज्ञ आहे. ती मुळची बंगळुरूची आहे.रवी मोहनने केनिशाबरोबर एका लग्नाला हजेरी लावली होती, तिथेही दोघेही सोनेरी रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग करून पोहोचले होते, त्यानंतर त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या. याचदरम्यान केनिशाचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला. हा फोटो पाहून ती गरोदर असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. अखेर केनिशाने याप्रकरणी मौन सोडलं आहे.
व्हायरल फोटोवर केनिशाची प्रतिक्रिया
केनिशा म्हणाली की, ज्या व्हायरल फोटोमुळे ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत, तो फोटो तिच्या ‘अँड्रम इंद्रम’ गाण्यातील आहे. फोटोत तिचे हात आहेत ते तिचं वाढलेलं पोट आहे, असा अंदाज लोकांनी बांधला आणि अफवा पसरवल्या. बिहाइंडवुड्स टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केनिशा म्हणाली, “बरेच लोक म्हणत आहेत की मी गरोदर आहे. माझ्याकडे सिक्स-पॅक नाहीत, पण मी गरोदरही नाही. आता मला माझे हात क्रॉस करण्यासाठी लोकांची परवानगी लागेल का?”
“मी देवदूत नाहीये, पण मी सैतानही नाहीये एवढंच सांगू इच्छिते. इथे लोकांनी एक अफवा पसरवली की त्यात इतर गोष्टींची भर घालून त्या वाढवल्या जातात. या सगळ्यांबद्दल बोलण्याची एक वेळ येते, मीही बोलू शकते, पण मी तसे न करण्याचा निर्णय घेतला,” असं केनिशाने नमूद केलं.

केनिशा व रवीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याची बायको आरती रवीने तिच्यावर टीका केली होती. त्यानंतर केनिशाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं गेलं. तिला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. इतकंच नाही तर तिच्याबद्दल वाईट कमेंट्स केल्या गेल्या.
ट्रोलिंगबद्दल काय म्हणालेली केनिशा?
“तुम्हापैकी बऱ्याच जणांना माझे सत्य आणि त्रास माहीत नसल्यामुळे असं बोलणं, वाईट शब्द वापरणं, अंदाज बांधणं सोपं आहे हे मी समजू शकते. पण तुम्ही जे अंदाज बांधताय त्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे, त्यासाठी मला माफ करा. पण मी देवाला प्रार्थना करते की लवकरच कधीतरी सत्य समोर येईल. जर मी चुकीची असेन, तर मी कायद्याने शिक्षा भोगण्यास तयार आहे. तोपर्यंत, मला द्वेषाशिवाय मोकळा श्वास घेण्याची परवानगी मिळेल का?” असं केनिशा या ट्रोलिंगबद्दल संताप व्यक्त करत म्हणाली होती.
दरम्यान, २२ मे रोजी आरती व रवी मोहन चेन्नईच्या कौटुंबीक न्यायालयात हजर राहिले. तिथे दोघांनी वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या. रवी मोहनने या लग्नात राहायचंच नसल्याचं कोर्टात सांगितलं. तर, दुसरीकडे आरतीने महिन्याला ४० लाख रुपयांची पोटगी मागितली.