|| नीलेश अडसूळ

‘आविष्कार’चे नाट्यप्रयोग असो, ‘सिंघम’सारखा हिंदी सिनेमा किंवा तरुणांना वेड लावणारा ‘मुरंबा’… त्यांची प्रत्येक आणि प्रत्येक भूमिका लक्षात राहणारी आहे. मराठीबरोबरच हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमधील कलाकृतींमध्ये आपल्या अभिनयाची मोहर उमटवत प्रेक्षकांच्या मनात त्यांनी स्थान मिळवले. केवळ अभिनयच नाही तर त्यांचा आवाज हीदेखील त्यांची ओळख झालेली आहे. तीच आवाजाची जरब, अभिनयाची साथ घेऊन ज्ञानाचा खेळ खेळण्यासाठी तब्बल सहा वर्षांच्या अंतराने ते छोट्या पडद्यावर येत आहेत. आता ज्ञानाचा खेळ म्हटल्यावर ‘कोण होणार करोडपती’ हे आपसूकच आलं आणि जेव्हा ती ‘हॉट सीट’ डोळ्यांपुढे दिसते तेव्हा सूत्रधाराच्या भूमिकेत सचिन खेडेकर हे एकच नाव आपल्यापुढे येतं. ‘कोण होणार करोडपती’च्या पहिल्या दोन्ही पर्वांना लोकप्रियतेच्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या सचिन खेडेकर यांच्यासोबतच यंदाचे हे नवे पर्व १२ जुलैपासून रंगणार आहे. त्यानिमित्ताने केलेल्या संवादात त्यांनी कार्यक्रमाबरोबरच नाटक, चित्रपट, ओटीटी विश्वावरही प्रकाश टाकला…

‘हा केवळ कार्यक्रम किंवा खेळ नसून ही जबाबदारी आहे. जगभरात १०० हून अधिक भाषांमध्ये हा कार्यक्रम होतो. आपल्याकडे हिंदीमध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी तो घराघरांत पोहोचवला. त्यामुळे या खेळाची गरिमा इतकी आहे की दडपण हे येतेच. कारण या कार्यक्रमाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवण्याचे ध्येय मनात असते,’ अशा शब्दांत त्यांनी कार्यक्रमाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘ज्ञानाच्या जोरावर कोट्याधीश होण्याची संधी विशेष वाटते. आयुष्यातल्या अडचणींवर मात करत, संघर्ष करत ही सामान्य माणसे त्या ‘हॉट सीट’वर पोहोचलेली असतात. त्यांचे अनुभव जेव्हा मी ऐकतो तेव्हा नट म्हणून माणूस म्हणून मला ते अधिकच श्रीमंत करतात. ध्येय प्राप्तीसाठी लागणारे पैसे जेव्हा ज्ञानाच्या जोरावर उभे राहतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अद्वितीय असतो,’ असेही ते म्हणाले.

केवळ सूत्रसंचालनच नव्हे तर नाना परिस्थितीतून आलेल्या स्पर्धकांना धीर देऊन, त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आपलेसे करणे, खेळाविषयी, तिथल्या उपकरणांविषयी आलेले दडपण दूर करणे, तांत्रिक बाबी समजावून सांगणे, त्यांच्या भावनांना वाट करून देणे अशा अनेक बाजूंनी त्यांचे काम सुरू असते. स्पर्धकांना जितकी तयारी करावी लागते, तितकीच मोठी जबाबदारी सूत्रसंचालकावरही असते. हेही एक सादरीकरणच आहे. बऱ्याचदा आपल्या व्यक्तिगत भावना, अनुभव यांच्या आधाराने परिस्थिती हाताळावी लागते, असे त्यांनी नमूद के ले.

‘यंदाच्या पर्वाला ‘ज्ञानाची साथ’ असे ब्रीद देण्यात आले आहे. ज्ञानाचा खऱ्या अर्थाने कस लावणाऱ्या या कार्यक्रमात साडेसहा लाख इच्छुक स्पर्धकांमधून केवळ २०० – २५० लोकांचीच निवड केली आहे. इथे ज्ञान असून चालत नाही, त्याला गतीही लागते. कारण उत्तर वेळेत देण्यालाही इथे महत्त्व आहे. शिवाय तुमच्याकडे केवळ पुस्तकी ज्ञान असून चालत नाही. समाजभान, सामान्यज्ञान, सतर्कता, हजरजबाबीपणा असे अनेक गुण या खेळासाठी आवश्यक आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

तर कोविडकाळातील मर्यादांविषयी बोलताना ते म्हणाले, ‘नियमावलीनुसार सर्व सूचनांचे पालन होऊन चित्रीकरण होते आहे, परंतु पूर्वीसारखे वातावरण आता नाही. कौतुकाने स्पर्धकांची पाठ थोपटता येत नाही, भावनिकप्रसंगी जवळ जाऊन धीर देता येत नाही, फोटो काढतानाही अंतर ठेवावे लागते. एरव्ही स्पर्धकांची निवड करताना त्या – त्या केंद्रावर जाऊन आम्ही परीक्षा घ्यायचो, मार्गदर्शन केले जायचे, पण यंदा मात्र सगळी प्रक्रिया ऑनलाइनच पार पडली. अशा वेळी पूर्वीचे दिवस आठवतात.’

चित्रपटांसाठी ओटीटी हे माध्यम नसून पर्याय आहे. पण मराठी चित्रपटांसाठी मात्र तो सशक्त पर्याय आहे. कारण अरुणा राजेंनी केलेला ‘फायर ब्रँड’ हा माझा सिनेमा आज नेटफ्लिक्सवर २५ ते ३० लाख लोकांनी पाहिला आहे, हाच चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असता तर कदाचित इतका प्रतिसाद मिळाला नसता. आज सुमित्रा भावेंच्या ‘दिठी’ या चित्रपटाला ओटीटीवर अभूतपूर्व प्रतिसाद आहे. कलाकार स्वत: याचा अनुभव घेत आहेत. अर्थात, हिंदीतल्या मोठ्या चित्रपटासाठी हे माध्यम पूरक नसले तरी मराठीसाठी आशादायी चित्र आहे..

 

नाटक ही माझी दुखती नस आहे. आज जरी वेगवेगळ्या माध्यमातून मी काम करत असलो तरी मी नाटकवाला आहे. आतापर्यंत आविष्कारच्या ‘मौनराग’चे प्रयोग करत आलोय. नाटकांचे वाचन, अभिवाचनही सुरू असते, पण लवकरच व्यावसायिक नाटकाकडे येण्याची इच्छा आहे. त्यादृष्टीने वाटचालही सुरू आहे. प्राजक्त देशमुखने लिहिलेल्या एका नाटकाचे वाचन झाले असून ती संहिता मला भावली आहे. शिवाय ‘फादर’ नावाचेही नाटक माझ्या विचारात आहे. त्यामुळे जेव्हा कोविडकाळ बाजूला होऊन नाट्यसृष्टी सुरू होईल तेव्हा मी नक्कीच रंगभूमीवर येईन. सतत कॅमेरापुढे काम करणाऱ्या कलाकारांनी रंगभूमीही करायलाच हवी. कारण इथे आपल्याला स्वत:ला तपासून पाहता येते. तालमी, प्रयोग, प्रयोगागणिक बदलत जाणारे नाटक, मिळणारी दाद, टीका, त्यातून सुधारलेल्या चुका असा प्रत्येक क्षण वेगळा अनुभव देणारा असतो.

 

‘मुरंबा’नंतर माझ्याकडे मराठी चित्रपट आले नाहीत, पण हिंदीत मात्र काम सुरू आहे. काही चित्रपटांचे चित्रीकरण करोनामुळे थांबले होते. आता शिथिलीकरणानंतर त्याला पुन्हा गती मिळाली. महेश मांजरेकरांच्या ‘अंतिम’ या हिंदी चित्रपटात मी आहे. अभिनेता प्रभाससोबत हिंदी आणि तेलुगूमध्ये काम करतो आहे. शिवाय ‘मुंबईकर’ नावाचा हिंदी चित्रपटही लवकरच येईल.

 

मराठी नटांनी हिंदीमध्ये इतक्या उंचीचे काम करून ठेवले आहे की आपल्याला तिथे अत्यंत आदराचे स्थान आहे. हिंदीमध्ये व्यावसायिकता अधिक असल्याने कामाच्या अनुषंगाने त्याचे फायदेही आहेत. आपल्याकडे काम करताना मैत्री आणि प्रेमाचा मामला अधिक असतो. पण तिथे मात्र कामाचे गांभीर्य आणि व्यावसायिकता यावर भर दिला जातो. आपण आपले काम शंभर टक्के दिले तर तिथे नक्कीच मानाचे स्थान मिळते.

 

करोनाकाळात नाटक थांबल्याने या व्यवसायावर चरितार्थ चालवणाऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते आहे, पण यातून कुठेतरी वाट काढायला हवी. ऋषिकेश जोशीने केलेला प्रयोग अभिनव आहे. नाटकाला तंत्रज्ञानाची जोड देऊन नाट्यगृहातले सादरीकरण थेट घरात बसून पाहता आले, तर लाखो लोक एकाच वेळी नाटक पाहू शकतील. शिवाय आर्थिक गणिते गतिमान होतील. आज के वळ खेळाडूंच्या उपस्थितीत झालेले आयपीएलचे सामने जगभरात पाहिले गेले तर नाटकही लोक नक्कीच पाहतील. – सचिन खेडेकर