समीर चौगुलेंनी दोन महिन्यांपूर्वीच घेतलेली मोहनदास सुखटणकरांची भेट, अनुभव शेअर करताना म्हणाले "त्यांच्या मिठीत..." | Actor Samir Choughule shared special post goes viral after Veteran Marathi Dramatist Actor Mohandas Sukhtankar passed away nrp 97 | Loksatta

समीर चौगुलेंनी दोन महिन्यांपूर्वीच घेतलेली मोहनदास सुखटणकरांची भेट, अनुभव शेअर करताना म्हणाले “त्यांच्या मिठीत…”

ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन झाले आहे.

समीर चौगुलेंनी दोन महिन्यांपूर्वीच घेतलेली मोहनदास सुखटणकरांची भेट, अनुभव शेअर करताना म्हणाले “त्यांच्या मिठीत…”
समीर चौगुलेंनी शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.

ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. मराठी रंगभूमीवरील नटसम्राट अशी त्यांची ओळख होती. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेते समीर चौगुले यांनी दोन महिन्यांपूर्वीच ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एक पोस्ट शेअर करत या भेटीचा अनुभव सांगितला होता.

समीर चौगुले हे १७ सप्टेंबर २०२२ रोजी ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या खास भेटीचा अनुभवही त्यांनी शेअर केला होता. हा अनुभव शेअर करताना त्याने एक पोस्टही लिहिली आहे.
आणखी वाचा : ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन

समीर चौगुलेची इन्स्टाग्राम पोस्ट

“ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मी मोहनदास काका सुखटणकर यांच्या घरी जाऊन त्यांचे आशिर्वाद घेण्याचा योग आला. ९३ वर्षांच्या या तरुणाने आजवर रंगभूमीवर केलेलं कार्य, काम, किस्से प्रत्यक्ष त्यांच्या मुखी ऐकणे हे अत्यंत आनंददायी होत. मोहनकाका “महाराष्ट्राची हास्यजत्रा” नियमित बघतात आणि त्यांना माझे काम खूप आवडते हे त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आमच्या दूरध्वनी वरील संभाषणात सांगितले होते… भेटायचा योग मात्र माझ्या कार्यबाहुल्यामुळे येत नव्हता..पण एक दिवस त्यांचा दूरध्वनी आला..

“समीर…अरे ९३ वर्षांचा आहे रे मी…तुला येऊन भेटायची इच्छा खूप आहे..पण शक्य होत नाही रे”…कुठेतरी आत चर्र झालं….गेले काही महिने थोडा वेळ ही काढता न यावा इतकं ही मोठ काम मी नक्कीच करत नसल्याची जाणीव झाली…स्वतःचाच राग आला… आणि त्याच दिवशी मी मोहनकाकांना त्यांच्या अंधेरीच्या घरी जाऊन भेटून आलो…मला भेटल्यावर मोहन काकांनी मला घट्ट मिठी मारली…त्यांच्या मिठीत वडीलकीची माया, थरथर आणि डोळ्यात आसवं होती…मला ही क्षणभर भरून आल…त्यांनी काठी टेकवत एखाद्या मोठ्या सत्कारमूर्तीचा करतात तसा शाल श्रीफळ देऊन माझा सत्कार केला..

मी वाकून नमस्कार केला..मला सुरकुत्या पडलेल्या हातांनी भरभरून आशिर्वाद दिले ..मला म्हणाले “तुझं आणि माझं दैवत एकच चार्ली चॅप्लिन…तू केलेला चार्ली चॅप्लिन बघितला तेव्हापासून तुला भेटायची इच्छा होती”…..मला म्हणाले ” तू आत्ता ज्या जागेवर बसला आहेस ना त्या जागी काही वर्षांपूर्वी “वपु” बसून गेले आहेत…विंदा बसून गेले आहेत..पुल भाई बसले होते” मला काय react व्हावं तेच कळेना .पुढचा अर्धा तास मी मोहन काकांचे किस्से, त्यांच्या संगीत नाटकांच्या आठवणी, त्या काळची दैवी माणसे याबद्धल फक्त ऐकत होतो आणि साठवत होतो.

फोनवर त्यांच्या ऐकलेला थकलेला आवाज त्या क्षणी गायब झाला होता….एक तुकतुकीत कांतीचा विलक्षण प्रतिभा असलेला एक तरुण माझ्या समोर मला दिसत होता.. अनुभवाने, आपल्या कामाने पर्वताहून मोठ्या असलेले हे रंगकर्मी अत्यंत खुल्या दिलाने माझं कौतुक करत होते…सध्याच्या कठीण काळात सातत्याने हास्य फुलवण्याच काम केल्याबद्धल आमच्या हास्यजत्रेच्या कुटुंबाला भरभरून आशिर्वाद देत होते….मोहन काकांना भेटून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या पिढीची आपल्या कामावर असलेली निष्ठा… आणि काकांना भेटून एक गोष्ट मी अक्षरशः लुटली ती म्हणजे…. “समाधान”..तुम्हाला कधी ही जुनेजाणते रंगकर्मी दिसले तर आवर्जून त्यांना भेटायला जा… त्यांची चौकशी करा…त्यांना किंचित nostalgic होऊ द्या…”, असे समीर चौगुलेने या पोस्टमध्ये म्हटलं होते.

दरम्यान ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. मराठी रंगभूमीवरील नटसम्राट अशी त्यांची ओळख होती. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहनदास सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून दीर्घकाळ नाट्यसेवा केली. त्यांच्या नाट्य प्रवासात ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ला महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ते ‘कार्यकर्ता’ या भूमिकेत वावरले.

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकात त्यांनी स्त्रीपात्र सोडून बहुतांश भूमिका साकारल्या. मोहनदास सुखटणकर यांनी आतापर्यंत ४० ते ४५ नाटकात काम केले होते. ‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘अखेरचा सवाल’, ‘दुर्गी’, ‘स्पर्श’, ‘आभाळाचे रंग’ यासारख्या अनेक नाटकात त्यांनी काम केले. त्याबरोबरच ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ या मराठी चित्रपटांतही ते झळकले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 14:34 IST
Next Story
Video: “भीमराज की बेटी…” महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेघा घाडगेने शेअर केला खास व्हिडीओ