‘मसीहा’च्या प्रेमात…

करोनाकाळात त्याने उभारलेली लोकोपयोगी कामे अजूनही त्याच पद्धतीने आणि वेगाने सुरू आहेत.

पडद्यावर अनेकदा हिरो लोकांचे तारणहार बनून आपल्यासमोर येतात. त्यांची प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट अशी ही छबी लोकांना भावते. मात्र प्रतिमेच्या चौकटीत न अडकता आपल्याला खरोखरच तारणहार होण्याचा किमान प्रयत्न करता आला याच आनंदात असलेला अभिनेता सोनू सूद सध्या आपल्या अभिनय कारकीर्दीतही नवनवे प्रयोग करू पाहतो आहे. करोनाकाळात ‘गरिबांचा मसीहा’ अशी ओळख मिळवलेला सोनू सध्या ‘नॅशनल जिओग्राफिक’ वाहिनीवरील ‘इट हॅप्पन्स ओन्ली इन इंडिया’ या नव्याकोऱ्या शोचा सूत्रसंचालक म्हणून लोकांसमोर येतो आहे.

‘इट हॅप्पन्स ओन्ली इन इंडिया’सारख्या माहितीपूर्ण मनोरंजनात्मक कार्यक्रमाशी सोनू कसा काय जोडला गेला? या प्रशद्ब्रावर बोलताना देशभरात काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात यशस्वी झालेल्यांच्या अनेक कमाल गोष्टी आहेत. या खऱ्याखुऱ्या व्यक्तींच्या गोष्टी आपल्याला माहितीही देतात आणि प्रेरणाही देतात. लहानपणी आईवडिलांकडून मी अशा खूप गोष्टी ऐकायचो. आता मला अशा प्रेरणादायी व्यक्तींच्या गोष्टी या कार्यक्रमातून सांगण्याची संधी मिळाली आणि मी ती घेतली. हजारो किलोमीटरवर कोणी झाडं लावली आहेत, कोणी बोगदा खणून मार्ग काढला आहे. या आश्चार्यचकित करणाऱ्या गोष्टी मला स्वत:ला ऐकताना खूप कमाल वाटली, मी त्या गोष्टींशी पहिले जोडला गेलो. आता त्याच गोष्टी प्रेक्षकांना सांगतानाही मला तेवढीच मजा येते आहे, असं सोनू सांगतो.

करोनाकाळात त्याने उभारलेली लोकोपयोगी कामे अजूनही त्याच पद्धतीने आणि वेगाने सुरू आहेत. या कामाची प्रेरणा मिळाली म्हणण्यापेक्षा लोकांनी माझ्याकडून ती कामं करून घेतली, असं तो सांगतो. लाखो लोकांना तुम्ही घरी कसं पोहोचवलंत? असा प्रशद्ब्रा मला विचारला जातो. मला वाटतं त्या लाखोंचे आईवडील, जिवलग यांच्या प्रार्थना, त्यांची तळमळ यातूनच ते साधलं गेलं असावं. माझ्यासाठी हा खूप कमालीचा अनुभव होता, असं तो म्हणतो. ‘आजही माझ्या घराखाली अनेक लोक खूप आशा घेऊन येतात. अनेकदा रात्री उशिरा त्यांच्या ट्रेन इथे पोहोचतात तसे ते रात्री २- ३ वाजता येऊन रात्रभर माझ्या घराखाली बसून असतात. कोणी सायकल विकू न, कोणी टीव्ही – मोबाइल विकू न दुसऱ्या शहरात एका आशेने येतात. या शहरात तुम्हाला तुमची समस्या ऐकू न घेणारं, त्यावर मार्ग शोधून देणारं असं कोणी भेटेल ज्यामुळे आपलं आयुष्यच बदलून जाईल, अशी आशा घेऊन कोणीतरी तुमच्यासमोर येतं. तेव्हा तुमच्याही खांद्यावरची जबाबदारी वाढलेली असते. त्यांच्या आशेवर, विश्वासावर आपण खरे उतरू शकू  का? ही एक मोठी कसोटी असते’, अशा शब्दांत त्याने आपला अनुभव मांडला.

लोकांनी आपल्यावर टाकलेला विश्वास, त्यांचं प्रेम हे आपण के लेल्या एखाद्या सर्वोत्तम भूमिके पेक्षाही लाखमोलाचं असतं याची जाणीव या अनुभवांनी दिल्याचेही तो सांगतो. ‘कलाकार म्हणून तुम्ही आयुष्यभर एका चांगल्या भूमिके ची प्रतीक्षा करत असता. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप चांगले-चांगले चित्रपट के ले, तुमच्या चित्रपटांनी तिकीटबारीवर चांगली कमाई के ली. तुमचं खूप नाव झालं, तुम्हाला या सगळ्याचा खूप आनंद होतो. मग तुम्हाला असं वाटतं की खऱ्या आयुष्यात तुम्ही असं काही कमालीचं करू शकता का? मी खूप नशीबवान आहे की मला वास्तवात अशी गोष्ट करता आली, जेणेकरून करोनाकाळात लोकांना खूप मदत झाली. एक वेगळीच भूमिका माझ्या वाट्याला आली आणि मी ती निभावली, याचा आनंद वाटतो’, असं तो सांगतो.

चित्रपटांच्या बरोबरीनेच देशात काय सुरू आहे, आपल्याकडे किती लोक काय-काय चांगलं घडवू पाहतात, याची माहिती आपल्यापर्यंत विशेषत: समाजमाध्यमांवर गुंतून पडलेल्या मुलं-तरुण यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे असं त्याला वाटतं. ‘इट हॅप्पन्स ओन्ली इन इंडिया’सारखे माहितीपूर्ण कार्यक्रम त्यादृष्टीने महत्त्वाचे असल्याचे तो म्हणतो. ‘या कार्यक्रमाच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. हे फक्त याच देशात होऊ शकतं. देशाच्या कु ठल्यातरी कानाकोपऱ्यात असलेल्या व्यक्ती असं काही काम करून जातात की तुमच्यासाठी त्या प्रेरणा ठरतात, आदर्श निर्माण करतात. एका व्यक्तीने आपलं अवघं आयुष्य हे शंभर एकरावर जंगल वसवण्यात घालवलं. तो झाडं लावत गेला आणि जंगल वाढवत गेला. इथे आपल्याला आयुष्यात उद्या काय हवं आहे याचं नियोजन क रता येत नाही. तो माणूस कु ठलीही अपेक्षा न करता फक्त  झाडं लावत राहिला आणि त्याने इतकं  मोठं जंगल निर्माण के लं ही आपल्या कल्पनेपलीकडची गोष्ट आहे’, असं तो सांगतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य लपत नाही. त्याने उभारलेलं समाजकार्य आणि कलाकार म्हणून असलेली कारकीर्द दोन्ही गोष्टी त्याच ताकदीने सांभाळण्याचा प्रयत्न कायम करत राहणार असल्याचं तो विश्वासाने सांगतो. सध्या त्याने दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांच्याबरोबर ‘आचार्य’ नावाचा चित्रपट पूर्ण के ला आहे. यशराजच्या ‘पृथ्वीराज’मधील त्याचे काम आणि डबिंग दोन्ही पूर्ण झाले असून हा चित्रपट नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित होणार असल्याची माहिती त्याने दिली. याशिवाय, तो स्वत: चित्रपट निर्मितीत उतरला असल्याने त्याचेही काम वेगाने सुरू आहे. करोनाकाळात थांबलेला चित्रपट उद्योग नव्याने पुन्हा सुरुवात करेल.  चित्रपटगृहे, चित्रपट सगळं रुळावर येईल असा विश्वास व्यक्त करतानाच करोनाकाळात काम गेल्यामुळे, शिक्षण सुटल्यामुळे जे मागे सुटले आहेत त्यांना खेचून पुन्हा आपल्याबरोबर आणणं ही खरी आत्ताची लढाई आहे, असं तो म्हणतो. सध्या लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. तरीही लोकांनी अजून थोडी काळजी घेणं गरजेचं आहे, असं त्याला वाटतं. ज्या बेफिकिरीने आपण करोनापूर्व काळात वागत होतो, तसंच आता वागून चालणार नाही. आपल्याला मिळालेले धडे लक्षात ठेवूनच वाटचाल के ली पाहिजे, असं तो आग्रहपूर्वक सांगतो.

प्रतिमेत अडकलेलं रसिकप्रेम…

सामान्य माणसाएवढा खास माणूस कोणीही नाही, असं मला कायम वाटत आलं आहे. पडद्यावर आपण तथाकथित हिरोच्या भूमिका साकारून त्यांच्यात आणि आपल्यात उगाचच एक अंतर निर्माण करतो. एक हिरो पडद्यावर येतो, दोन तास हाणामारी-नृत्य करून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. त्याची एक लोकप्रिय प्रतिमा तयार होते, त्या प्रतिमेलाच कवटाळून आपण कायम जगत असतो. आपल्या देशात आपण प्रत्यक्षाहून उत्कट असलेल्या या प्रतिमेलाच मोठं करत राहतो. हाच कलाकार पडद्यावरून उतरून जेव्हा प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळतो. त्यांच्या बाजूला बसून, त्यांचा हात हातात धरून पडद्यावर दिसणारा तो मी नाही आहे. तो माझा के वळ व्यवसाय आहे. मी तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे हे सांगू शकतो, त्यांच्याबरोबरीने काम करू शकतो… ती खरी त्या व्यक्तीची ताकद आहे, त्याची ओळख आहे. मला हे कसं साध्य झालं माहिती नाही, पण मी हे करू शकलो याबद्दल मी देवाचे आभार मानतो. लोकांच्या मनात मिळालेलं हे स्थान टिकवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन. सगळंच काही मला जमणार नाही, चुकाही होतील, पण मी प्रयत्न करणं सोडणार नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actor sonu sood it happens only in india recreational program akp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या