Suriya Jyothika Relationship Secrets : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सूर्या आणि त्याची पत्नी अभिनेत्री ज्योतिका ही तमिळ सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि आदर्श जोडी मानली जाते. नुकताच अभिनेता सूर्याने प्रेम, वैवाहिक आयुष्य आणि नात्यात महिलांना दिला जाणारा आदर यावर आपले मत मांडले आहे. लग्नानंतर काळानुसार माणसं बदलतात, पण एकमेकांबद्दलच्या भावना आणि प्रेम कधीही कमी होता कामा नये, असा सल्ला त्याने आजच्या तरुणाईला दिला आहे. तसेच नात्यात प्रेमापेक्षाही महिलांचा सन्मान करणे आणि त्यांना पाठिंबा देणे किती महत्त्वाचे आहे, यावर सूर्याने भाष्य केले आहे.
“मला तरुणांना प्रेमाबद्दल एक सल्ला द्यायचा असेल तर तो हाच आहे, की प्रेम हे नेहमी टिकणारं असावं. ते केवळ लग्नाआधी किंवा लग्नापुरतं मर्यादित नसावं. तुम्ही तुमच्या जोडीदारावर रोज प्रेम केलं पाहिजे. २० वर्षांनंतरही तुमचं प्रेम, काळजी आणि आदर तसाच राहिला पाहिजे,” असं सूर्या म्हणाला.
जोडीदारावरचं प्रेम बदलता कामा नये – सूर्या
एकत्र राहताना काळाच्या ओघात माणसं बदलतात, हे सूर्याने मान्य केलं. दिवस सरतात, पण आपल्या आयुष्यातील व्यक्तीबद्दलच्या भावना मात्र कधीही बदलू नयेत, असं सूर्याने म्हटलं. “आपण सगळेच बदलतो. काळानुसार आपल्या गरजा, विचारसरणी आणि आयुष्याची ध्येये बदलतात. पण आपल्या जोडीदारावर असलेलं प्रेम कधीही बदलता कामा नये,” असं सूर्या म्हणाला.
महिलांचा आदर करा, त्यांना पाठिंबा द्या – सूर्या
नात्यात प्रेमापेक्षाही आदर जास्त महत्त्वाचा असल्याचं सूर्याने सांगितलं. महिला कुटुंबाची मोठी जबाबदारी उचलतात आणि अनेकदा त्या जो त्याग करतात, त्याकडे सर्वांचं दुर्लक्ष होतं, असं सूर्याला वाटतं. “प्रेमापेक्षा त्यांना आदर द्या. महिलांचं १० वेळा नाही, तर १०० वेळा कौतुक करा आणि त्यांना शक्य तो सर्व पाठिंबा द्या,” असं सूर्या म्हणाला.
सूर्या व ज्योतिकाचं लग्न
सूर्या व ज्योतिका हे तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील आदर्श जोडपं आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांच्या नात्याकडे आदराने पाहिलं जातं. सूर्या आणि ज्योतिका यांची पहिली भेट १९९९ मध्ये ‘पुवेल्लाम केट्टुप्पार’च्या सेटवर झाली होती. ज्योतिका तेव्हा तमिळ सिनेसृष्टीत नवीन होती, शूटिंगदरम्यान सूर्याने तिला भाषा शिकण्यास मदत केली होती. नंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि २००३ मध्ये ‘काका काका’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी ‘पेरळगन’ आणि ‘सिल्लुनु ओरु काधल’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आणि ११ सप्टेंबर २००६ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली.
लग्नानंतर ज्योतिकाने मुलं दिया आणि देव यांच्या संगोपनासाठी काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला. त्यानंतर २०१५ मध्ये ‘३६ वयधिनिले’ चित्रपटातून तिने पुनरागमन केलं. तेव्हा सूर्याने तिचं खूप कौतुक केलं होतं. नंतरच्या वर्षांमध्ये ज्योतिकाने ‘मगलिर मट्टुम’, ‘राक्षसी’ आणि ‘पोनमगल वंधाल’ यांसारख्या चित्रपटांमधून तिच्या करिअरची दुसरी इनिंग सुरू केली आणि हिट सिनेमे दिले.
दुसरीकडे, सूर्याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो लवकरच व्यंकी अट्लुरी दिग्दर्शित ‘विश्वनाथ अँड सन्स’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात राधिका सरथकुमार आणि रवीना टंडन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
