Trisha Krishnan & Thalapathy Vijay Affair : दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयचं अभिनेत्री त्रिशा कृष्णनबरोबर नाव जोडलं जात आहे. काही दिवसांपासून दोघांच्या नात्याबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. त्याचमुळे थलपती विजयची पत्नी संगीता हिने २६ वर्षांनंतर घटस्फोटासाठी अर्ज केला आणि त्यामध्ये विजयचे एका अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा आरोप केला आहे.
विजयच्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यानच तो आणि त्रिशा चेन्नईमध्ये एका लग्नाला एकत्र गेले होते. दोघांचे अनेक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यामुळे त्रिशाला ट्रोल करण्यात आले होते.
विजय व त्रिशा यांच्याबद्दल खुशबू सुंदर म्हणाली…
निर्माते कलपथी एस. सुरेश यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला विजय आणि त्रिशा यांनी एकत्र हजेरी लावली होती. त्यामुळे विजयच्या पत्नीने अभिनेत्रीबरोबर अफेअर असल्याचा दावा केलेली ही त्रिशाच असणार अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या. त़्यावर स्वत: त्रिशाने अजून काही उत्तर दिलेले नाही. पण अभिनेत्रीच्या ट्रोलिंगवर आता तिची मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू सुंदर हिने उत्तर दिले आहे.
खुशबू सुंदर म्हणाली, “लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय यावर कमेंट करण्यात एक प्रकारचं सुख मिळते. जे लोक कमेंट करतात, त्यातील ९९.९ टक्के लोकांना आपण ओळखतही नसतो. त्यामुळे कोण काय बोलतं यासाठी आपण जबाबदार नसतो आणि त्यांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवण्याची गरज नाही.”
त्रिशाबद्दल सुरू असलेल्या चर्चांबाबत तिला विचारण्यात आले. त्यावर तिने आपण अशा काळात जगत आहोत, जिथे एखाद्याला साधी शिंक जरी आली, तरी लोक त्याचं खापर दुसऱ्या कोणावर तरी फोडतात, असं म्हटलं. पुढे ती म्हणाली, “त्रिशा माझी खूप जवळची मैत्रीण आहे. ती मनानं खूप चांगली व्यक्ती आहे.”
अभिनेता विजय अन् पत्नी संगीताच्या नात्याबद्दल…
थलपती विजयची पत्नी संगीताने लग्नाच्या २७ वर्षांनंतर घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. तिने विजयवर विश्वासघात आणि विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला आहे. याचिकेत तिने दावा केला आहे की, पतीचे एका अभिनेत्रीशी संबंध आहेत आणि याची माहिती तिला २०२१ मध्ये मिळाली. याचिकेत तिनं सासरच्या घरी राहण्याचा हक्क मागितला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. हे दाम्पत्य मागील दोन वर्षांपासून वेगळे राहत आहे. १९९९ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
