Thalapathy Vijay Divorce: दाक्षिणात्य सिनेविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. तमिळ सुपस्टार व राजकारणी थलपती विजयचा २७ वर्षांचा संसार मोडला आहे. विजयची पत्नी संगीता विजय हिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. संगीताने पतीचे अभिनेत्रीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोपही केले आहेत.

विजयच्या पत्नीने घटस्फोटासाठी चेंगलपट्टू येथील जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका विशेष विवाह कायदा, १९५४ च्या कलम २७(१)(अ), (ब), (ड) आणि कलम ३६ व ३७ अंतर्गत दाखल करण्यात आली आहे.

४८ वर्षीय संगीताने याचिकेत नमूद केलेल्या माहितीनुसार, तिने व विजयने १० जुलै १९९८ रोजी युकेमध्ये लग्नाची नोंदणी केली होती. त्यानंतर, २५ ऑगस्ट १९९९ रोजी चेन्नईमधील राजा मुथिया मंडपम इथे हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांचं लग्न झालं होतं. याचिकेतील माहितीनुसार, संगीता व विजय यांच्या लग्नाची सुरुवातीची काही वर्षे खूप आनंदी होती. संगीताने घर सांभाळलं व मुलांचं संगोपन केलं. पण एप्रिल २०२१ मध्ये पती विजयचे एका अभिनेत्रीबरोबर अनैतिक संबंध असल्याचं तिला समजलं. यामुळे प्रचंड मानसिक त्रास झाला असून, हा विश्वासघात असल्याचं संगीताने म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलंय.

विजयच्या अफेअरमुळे मानसिक त्रास झाला – संगीता

संगीताच्या मते, तिने याबद्दल विचारल्यावर विवाहबाह्य संबंध संपवणार, असे आश्वासन विजयने दिले होते. पण तसं झालं नाही. यामुळे मानसिक त्रास झाला, सोशल मीडिया पोस्टमुळे सार्वजनिक अपमान सहन करावा लागला, तसेच विजयने दुर्लक्ष केलं. त्याचबरोबर सप्टेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ आणि पुन्हा ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत वकील आणि आपापसात चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले, पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले, असंही या याचिकेत संगीताने म्हटलंय.

Vijay wife Sangeetha
विजय व त्याची पत्नी संगीता (फोटो- सोशल मीडिया)

संगीता विजयची मागणी काय?

आपलं लग्न आता फक्त कागदोपत्रीच उरलंय, असं म्हणत संगीता विजयने काही मागण्या केल्या आहेत. त्यानुसार, कायदेशीररित्या घटस्फोट मंजूर करण्यात यावा, विजयचे उत्पन्न आणि सामाजिक दर्जा यानुसार योग्य ती पोटगी मिळावी, तसेच या याचिकेवर निर्णय येईपर्यंत तिला नीलांकरई येथील त्याच्या घरात राहण्याचा अधिकार मिळावा आणि दोघांची प्रतिमा व प्रायव्हसी जपण्यासाठी प्रकरणावरील सुनावणी ‘इन-कॅमेरा’ व्हावी, असं संगीता विजयने याचिकेत नमूद केलंय.

विजय व संगीताचे लग्न

संगीता ही श्रीलंकन तमिळ आहे. विजयने २५ ऑगस्ट १९९९ रोजी संगीताशी लग्न केलं होतं. विजयचं लग्न तो सुपरस्टार होण्यापूर्वी झालं होतं. विजयने करिअर केलं, तर संगीताने घर व मुलं सांभाळली. दोघांनीही आपलं खासगी आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. पण आता संगीताने विवाहबाह्य संबंधांचे आरोप करत विजयपासून घटस्फोट मागितला आहे.