scorecardresearch

‘सिंगल फादर’ व्हायचंय हे आई-वडिलांना सांगितल्यावर काय होती प्रतिक्रिया? तुषार कपूर म्हणतो…

लक्ष्यच्या जन्माच्या सहा वर्षांनी तुषारने ‘बॅचलर डॅड’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.

बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर हा सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. बॉलिवूडमधील पहिलाच सिंगल फादर म्हणून त्याला खास ओळखले जाते. सरोगसीच्या माध्यमातून तुषार हा लक्ष्य या गोंडस मुलाचा बाप झाला. २०१६ मध्ये लक्ष्य हा तुषारच्या आयुष्यात आला आणि त्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. लक्ष्यच्या जन्माच्या सहा वर्षांनी तुषारने ‘बॅचलर डॅड’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. यात त्याने त्याच्या संपूर्ण प्रवासाबद्दल माहिती दिली आहे.

तुषारने लिहिलेले हे पुस्तक लवकरच प्रदर्शित होणार आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी त्याने ई टाईम्स या वृत्तपत्राशी बातचित केली. यावेळी त्याने अनेक लक्ष्यचा जन्म, त्याचे नाव कसे ठेवले, त्याच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया काय होती या गोष्टींबद्दल माहिती दिली आहे.

या मुलाखतीत तुषारला मुलाचे नाव लक्ष्य ठेवण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, “लक्ष्य म्हणजे ध्येय. सर्व पालकांसाठी त्यांची मुले ही पहिली प्राथमिकता असली पाहिजे. त्यामुळे माझे लक्ष्य हे ‘लक्ष्य’ आहे. त्याचे नाव ठेवण्याची सर्व श्रेय हे त्याची आत्या म्हणजेच माझी बहिण एकता कपूरला जाते. एकताने काही नावे शॉर्टलिस्ट करुन ठेवली होती. त्यातील लक्ष्य हे नाव मला वेगळे वाटले आणि ते मला आवडलेही. त्यामुळे आम्ही ते नाव ठेवले.”

यावेळी तुषार कपूरला विचारण्यात आले की मग तू पुस्तक लिहिण्याचा विचार कसा काय केलास? यावर उत्तर देताना तो म्हणाला की, “लक्ष्य ४ वर्षांचा झाल्यानंतर माझे अनेक मित्र, सहकलाकारांनी सिंगल फादर असण्याचा अनुभव मला विचारला. तू तुझे हे सर्व अनुभव पुस्तकात का लिहून ठेवत नाहीस, असा सल्लाही अनेकांनी दिला.”

निक जोनसने लग्नात मंगळसूत्र घातल्यावर कसं वाटलं? प्रियांका चोप्रा म्हणाली “माझ्यासाठी तो…”

“यानंतर मलाही वाटले की आपण एक वेगळा तुषार जगासमोर मांडू शकतो. जो केवळ एक अभिनेता नाही तर एक पालक आहे आणि एक उत्तम लेखकही आहे. लॉकडाऊनने मला पुस्तक लिहिण्यास पुरेसा वेळ दिला आणि माझ्या एका लेखक मित्राने मला यासाठी बॅचलर डॅड हे नाव सुचवले. आम्हाला दोघांनाही शीर्षक आवडले आणि आम्ही ते देण्याचा निर्णय घेतला,” असेही त्याने सांगितले.

‘तुला एका वेगळ्या पद्धतीने बाबा व्हायचे आहे हे तू सर्वात आधी कोणाला सांगितले?’ असा प्रश्न तुषारला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “मी आधी स्वतःशी बोललो. मला खात्री पटल्यानंतर मी वैद्यकीय चाचण्या केल्या. त्या यशस्वी झाल्यावर मी आधी आईला सांगितले आणि त्यानंतर तिने पुढे बाबांना सांगितले. एक दोन महिन्यांनी मी एकताला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. आम्ही याबद्दल खूप गोपनीय असणे अपेक्षित होते कारण ते अत्यंत संवेदनशीलतेने केले जावे,” असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

“मी जेव्हा माझी आई शोभा कपूरला हा निर्णय सांगितला तेव्हा तिला जरा आश्चर्य वाटलं. त्यासोबत तिला धक्काही बसला. जर तू त्या मुलाची जबाबदारी घेणार असशील तर आम्ही या निर्णयात तुझ्यासोबत आहोत, असे तिने मला त्यावेळी सांगितले. त्या मुलाचे आजी-आजोबा म्हणून आम्ही तुला मदत करु. पण तुला तुझ्या पुढच्या प्रवासबद्दल स्पष्ट राहावे लागेल. त्यामुळे सुदैवाने तिने या निर्णयाला कोणतीही हरकत घेतली नाही,” असे तुषार कपूरने सांगितले.

रिंकूने आई-वडिलांसाठी शेअर केली खास पोस्ट, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली…

तर दुसरीकडे बाबा म्हणजेच जितेंद्र कपूर यांना याबाबतचा निर्णय विचारल्यावर ते फार चकित झाले. “मी काहीतरी चुकीचे करत आहे, हे सर्व कसे होईल याबद्दल त्यांना आश्चर्य वाटायचे. पण ते यादरम्यान फार शांत होते. त्यांची प्रतिक्रिया फार मजेशीर होती. त्याचा संपूर्ण खुलासा मी पुस्तकात केला आहे,” असे तुषार म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor tusshar kapoor share personal story of becoming bachelor dad know family reactions nrp

ताज्या बातम्या